कर्नाटकातील ८६५ गावांतील ३० लाख मराठी भाषिक ठरवणार १८ आमदार

बेळगाव : कर्नाटक विधानसभा निवडणुकीसाठी आज मतदान होत आहे. आज (१० मे) सकाळी सात वाजेपासून मतदानाला सुरुवात झाली आहे. यंदाच्या निवडणुकीसाठी कर्नाटकातील ५ कोटी ३१ लाख मतदार मतदान करणार असून हे मतदान राज्यातील २,६१५ उमेदवारांचे भवितव्य ठरवणार आहेत. या महाराष्ट्राचे लक्ष लागून आहे बेळगाव जिल्ह्यासह ८६५ मराठी भाषिक गावांच्या निवडणुकीकडे!

महाराष्ट्र आणि कर्नाटक सीमाप्रश्न हा सर्वोच्च न्यायालयात असून कर्नाटकात जबरदस्तीने डांबण्यात आलेल्या ८६५ मराठी गावांवर महाराष्ट्राने आपला दावा सांगितला आहे. या ८६५ मराठी गावांची लोकसंख्या ही ४० ते ४२ लाख इतकी असल्याचं सांगितलं जातंय. यामध्येही संपूर्ण कर्नाटकातून जवळपास ३० लाख मराठी भाषिक मतदान करतील असा अंदाज आहे.

बेळगाव जिल्ह्यात एकूण १८ मतदारसंघ असून बहुतांश ठिकाणचे आमदार हे मराठी भाषिक मतदार ठरवतात. त्यामध्ये बेळगाव ग्रामीण, बेळगाव दक्षिण, बेळगाव उत्तर, खानापूर, निपाणी, यमकनमर्डी, चिक्कोडी, हुकेरी, कागवाड आणि अथनी जिल्ह्यामध्ये मराठी भाषकांचे प्राबल्य असून त्यांचा कौल हा निर्णायक ठरतो.

बेळगाव दक्षिण, बेळगाव ग्रामीण, खानापूर, कागवाड आणि निपाणी या मतदारसंघातील आमदार कोण हे मराठी भाषिक मतदार ठरवतात. या मतदारसंघात सुमारे ६० ते ७० टक्के मतदार हे मराठी भाषिक आहेत. त्यामुळे या ठिकाचे सर्वपक्षीय उमेदवारही मराठीच असतात. त्यानंतर यमकनमर्डी, बेळगाव उत्तर, चिक्कोडी, रायबाग, हुक्केरी या ठिकाणी मराठी मतं ही निर्णायक ठरतात.

या व्यतिरिक्त भालकी आणि कारवार हे मतदारसंघ मराठी भाषिकांचे असल्याचं सांगण्यात येतंय. कारवार जिल्ह्यात चार मतदारसंघात आमदार कोण हे मराठी भाषिक मतदार ठरवतात. तर बिदर जिल्ह्यातील चार, गुलबर्गा जिल्ह्यात चार मतदारसंघावर मराठी भाषिकांचे वर्चस्व आहे. हावेरी, हसन या जिल्ह्यांत आणि बंगळुरुमध्येही मराठी भाषिक मतदार निर्णायक ठरतात.