बंगळुरू । काही महिन्यांपूर्वी कर्नाटकच्या विधानसभा निवडणुकीत काँग्रसने दणदणीत विजय मिळवला. या निवडणुकीत पराभव झाल्यामुळे भाजपा सध्या विरोधी बाकावर आहे. मात्र, कर्नाटकमधील काँग्रेस सरकार लवकरच कोसळणार असल्याचा दावा माजी मुख्यमंत्री एच.डी. कुमारस्वामी यांनी केलं आहे. दरम्यान, कुमारस्वामी यांच्या विधानामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या असून कर्नाटक सरकारवर चर्चा रंगली आहे.
मध्य प्रदेश आणि महाराष्ट्रात भाजपने आश्चर्यकारक सरकार स्थापन केलं होतं. मध्य प्रदेशमध्ये ज्योतिर्रादित्य शिंदेंना आपल्या पक्षात घेत भाजपाने तेथील काँग्रेसचं सरकार पाडलं. तसेच, महाराष्ट्रातही शिवसेनेत मोठा बंड झाला आणि एकनाथ शिंदेंच्या नेतृत्त्वात ४० ते ५० आमदारांनी भाजपासोबत महायुती करुन सरकार स्थापन केलं. महाराष्ट्रात उद्धव ठाकरेंच्या नेतृत्त्वातील महाविकास आघाडी सरकार कोसळलं. आता, भाजपने कर्नाटकातही तोच फॉर्म्युला अवलंबण्यास सुरुवात केल्याचं दिसून येत आहे. कारण, जनता दल सेक्युलर पक्षाचे नेते आणि कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री एच.डी. कुमारस्वामी यांनी लवकरच कर्नाटक सरकार कोसळणार असल्याचा दावा केला आहे.
कर्नाटकमध्ये मंत्री असलेला एक काँग्रेस नेता ५० ते ६० आमदारांसह लवकरच भाजपात प्रवेश करेल. कदाचित लवकरच कर्नाटकमधील काँग्रेस सरकार कोसळेल, काहीही घडू शकतं. असा दावा कुमारस्वामी यांनी केला आहे. दरम्यान, कुमारस्वामी यांच्या विधानामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या आहे.