कर्नाटक निकालावर सट्टेबाजाची पसंती या पक्षाला

बंगळुरु : आगामी लोकसभा निवडणुकीच्या दृष्टीने महत्त्वाची निवडणूक मानली जाणार्‍या कर्नाटक विधानसभा निवडणुकीचा निकाल १३ रोजी लागत आहे. गेल्या वेळी २०१८ च्या निवडणुकीत सट्टा बाजारात भाजपावर मोठ्या प्रमाणात पैसे लागले होते. परंतू, सर्वांचे पैसे डुबले होते. कारण काँग्रेसला सर्वाधिक जागा मिळाल्या होत्या व जेडीएससोबत मिळून सत्ता स्थापन झाली होती. नंतरच्या सत्तेच्या राजकारणात भाजपाने हे सरकार पाडले आणि आपले सरकार स्थापन केले.

यंदा २२४ जागांच्या या निवडणुकीत एक्झिट पोलमध्ये काँग्रेसला सर्वाधिक जागा मिळताना दिसत आहेत, तर सत्ताधारी भाजपाची सत्ता जाताना दिसत आहे. हा सगळा खेळ मतदार राजा करणार आहे. यंदा गेल्या वेळेपेक्षा दोन टक्के जास्तीचे म्हणजेच एकूण ७२.६७ टक्के मतदान झाले आहे. यामुळे कर्नाटक निवडणुकीवर सट्टाबाजारानेही वेग घेतला आहे.

कर्नाटकच्या यंद्याच्या निवडणुकीत सट्टेबाजांनी भाजपावर नाही तर काँग्रेसवर पैसा लावला आहे. सट्टेबाजांनुसार भाजपाला ८०, जेडीएसला ३७ जागा मिळण्याची शक्यता आहे. या निवडणुकीच्या निकालावर जे बुकी सट्टा घेत आहेत त्यांच्यानुसार काँग्रेसला १२० ते १३० जागा मिळण्याची शक्यता आहे. मतदार राजाचा कल नेमका कुणाकडे आहे? याचे उत्तर उद्याच मिळणार आहे.