कसा झाला अपघात? वाचलेल्या दोन प्रवाशांनी सांगितला अपघाताचा थरार

तरुण भारत लाईव्ह । बुलढाणा : बुलढाण्यात समृद्धी महामार्गावर बसचा भीषण अपघात झाला. या घटनेत २५ प्रवाशांचा जागीच मृत्यू झाला. या घटनेत काही प्रवासी वाचले आहेत. विदर्भ ट्रॅव्हल्सची ही बस होती जी पुण्याकडे निघाली होती त्या बसला रात्री दीड च्या सुमारास अपघात झाला. टायर फुटल्यामुळे हा अपघात झाल्याचे सांगितले जात असले तरी या भीषण अपघातातून वाचलेल्या दोन प्रवाशांनी या अपघाताचा थरार सांगितला आहे.

नागपूरहून पुण्याच्या दिशेने निघालेल्या बस मध्ये आम्ही बसलो होतो. रात्री आमचं जेवण झालं. त्यानंतर रात्रीच्या सुमारास बस रस्त्याच्या दुभाजकाला धडकली. ही बस उलटली. बस उलटल्यानंतर बसने पेट घेतला. वरची काचेची खिडकी आम्ही तोडली आणि बाहेर पडलो. बस उलटल्यानंतर बसला आग लागली. त्यानंतर या बसचे टायरही फुटले. डिझेलच्या टाकीचा स्फोट झाला आणि काही वेळातच संपूर्ण बस पेटली. अशीही माहिती या प्रवाशांनी दिली आहे.

या बसमध्ये ३२ प्रवासी होते. बस उलटल्यानंतर या बसने पेट घेतला. डीझेल टँक फुटून आग लागली आणि वाढली त्यामुळे बसमधले प्रवासी होरपळले. २५ प्रवाशांचा जागीच मृत्यू झाला. काही प्रवासी काचा फोडून बाहेर पडले असंही पोलिसांनी सांगितलं. अपघात झाल्यानंतर घटना स्थळी पोलीस आले, अग्निशमन दलाच्या गाड्याही आल्या आणि त्यांनी आग नियंत्रणात आणण्यास सुरुवात केली असं प्रवाशांनी सांगितलं.