काँग्रेसचा दारुण पराभव; इंडिया आघाडीत आनंदाची लाट?

मध्यप्रदेश, राजस्थान आणि छत्तीसगड या तीन राज्यांत काँग्रेसचा दारुण पराभव झाल्याने इंडिया आघाडीतील अनेक घटक पक्षांमध्ये आनंदाची लाट आहे. कारण तीच काँग्रेस जी पाच राज्यांच्या निवडणुकांमुळे लोकसभेच्या जागावाटपाबाबत घटक पक्षांशी बोलण्यास तयार नव्हती.  या निवडणुकीत काँग्रेसला पूर्ण विश्वास होता की जिंकू. मात्र, तसं झालं नाहीय.

इंडिया आघाडीत आनंदाची लाट का?
किंबहुना, स्थानिक क्षत्रप आता काँग्रेसशी युती करून समान पातळीवर बोलू शकतील आणि त्यांना काँग्रेसचा दबाव यापुढे जाणवणार नाही. चारपैकी तीन राज्यांतील पराभवानंतर काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी विरोधी पक्षांची बैठक बोलावली आहे. पराभवानंतर काँग्रेसवर साहजिकच दबाव आहे. त्यामुळे विरोधी आघाडीच्या बैठकीत राज्यांतील वरिष्ठ नेत्यांचा प्रभाव वाढताना दिसेल, अशी शक्यता आहे.

नितीशकुमार, अखिलेश यादव, ममता बॅनर्जी आणि अरविंद केजरीवाल काँग्रेसच्या पराभवानंतर समान पातळीवर बोलू शकतील आणि काँग्रेस त्यांना गांभीर्याने घेईल अशी शक्यता आहे. यापुढे इंडिया  आघाडीत मोठ्या भावाची भूमिका बजावणाऱ्या काँग्रेसला सर्व पक्षांशी समन्वय साधून काम करणे भाग पडणार आहे, त्यामुळे प्रादेशिक पक्षांनी काँग्रेसच्या पराभवाचा आनंद साजरा केलाच पाहिजे. आता संयोजकांपासून ते पंतप्रधानपदाच्या उमेदवारापर्यंत काँग्रेसचा दबाव कमी होणार असून नितीश यांच्यासारख्या नेत्याला अधिक सक्रिय दिसण्याची शक्यता वाढली आहे, हे उघड आहे.