“आम्ही देश वाचवण्यासाठी इंडिया आघाडी स्थापन केली होती. पण या इंडिया आघाडीकडे दुर्लक्ष करून काँग्रेस पक्ष पाच राज्यांतील निवडणुकांमध्ये व्यस्त झाला आहे. सध्या इंडिया आघाडीत कोणतेही काम होत नाही.” असे विधान बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी केले आहे.
ते इंडिया आघाडीतील घटक पक्ष असलेल्या सीपीआयच्या रॅलीत बोलत होते. त्यांनी आपल्या भाषणात काँग्रेसवर निशाणा साधला. त्यासोबतच त्यांनी नाराजी सुद्धा व्यक्त केली. नितीश कुमार यांचा विरोधकांची आघाडी बनवण्यात मोठा हात होता. पण विरोधकांची आघाडी बनल्यापासून त्यांना इंडिया आघाडीतून बाजूला सारण्यात आले आहे. त्यावेळी आलेल्या रिपोर्टनुसार आघाडीला इंडिया ना देण्यावरुन नितीश कुमार नाराज झाले होते.
तराही विरोधी आघाडीतील घटक पक्षांनी त्यांच्या नाराजीवर लक्ष न देता आघाडीचे नाव इंडिया आघाडी ठेवले. त्याचबरोबर इंडिया आघाडीने त्यांना संयोजक पद सुद्धा दिले नाही. याउलट एक समन्वय समिती स्थापन करण्यात आली. या समन्वय समितीमध्ये शरद पवार यांचा समावेश आहे. पण नितीश कुमार यांना या समन्वय समितीमध्ये स्थान देण्यात आले नाही. त्यामुळे ते नाराज आहेत. त्यामुळेच ते अशी वक्तव्य करत आहेत, असे राजकीय जाणकारांचे मत आहे.