मुंबई : नुकतीच बिहारमधील जातीय जनगणनेची आकडेवारी जाहीर करण्यात आली आहे. यावरुन देशात राजकारण रंगले आहे. आता पंतप्रधान नरेंद्र मोदींनी यावर प्रतिक्रिया दिली आहे. यावेळी त्यांनी काँग्रेसवर जोरदार टीका केली आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की, “काँग्रेस कालपासून एकच वाक्य बोलत आहेत, ‘जेवढी लोकसंख्या तेवढा हक्क.’ परंतु, माझ्यासाठी सर्वात मोठी लोकसंख्या ही गरीबी आहे आणि गरिबांचे कल्याण हे माझे मुख्य उद्दिष्ट आहे, असे त्यांनी सांगितले.
तसेच ते पुढे म्हणाले की, “माजी पंतप्रधान मनमोहन सिंग म्हणायचे की देशाच्या साधनसंपत्तीवर पहिला हक्क अल्पसंख्याकांचा आहे. पण आता काँग्रेस म्हणतेय की, देशाच्या साधनसंपत्तीवर पहिला हक्क कोणाचा असेल हे समाजाची लोकसंख्या ठरवेल. मग काँग्रेसला अल्पसंख्याकांचे हक्क काढून घ्यायचे आहेत का? त्यांना अल्पसंख्याकांना हटवायचे आहे का? सर्वात जास्त लोकसंख्या असलेल्या हिंदूंनी पुढे येऊन आपले सर्व हक्क मिळवावेत का?असा प्रश्न पंतप्रधान मोदींनी विचारला.
तसेच काँग्रेस पक्ष आता काँग्रेसवाले चालवत नाहीत. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते तोंडाला कुलूप लावून बसले आहेत. आता काँग्रेस अशा लोकांकडून चालवली जात आहे, जे लोक देशविरोधी शक्तींशी हातमिळवणी करत आहेत. काँग्रेसला कुठल्याही किमतीत देशातील हिंदूंमध्ये फूट पाडून भारताचा नाश करायचा आहे, असेही पंतप्रधान नरेंद्र मोदी यावेळी म्हणाले आहेत.