बंगालमध्ये जाणार आणि तृणमूल काँग्रेस मुळासकट उखडून टाकेन, अशी गर्जना केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी केली आहे. अमित शहा यांनी पश्चिम बंगालची राजधानी कोलकाता येथे सभेला संबोधित केले. यावेळी त्यांनी पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्यावर जोरदार निशाणा साधला. ते म्हणाले, ‘ममता दीदींची वेळ संपली आहे, भाजप पश्चिम बंगालमध्ये सरकार स्थापन करेल आणि २०२४ च्या निवडणुकीत सत्तेवर येईल.’ असे प्रतिपादन शहांनी यावेळी केले.
अमित शहा म्हणाले, “कम्युनिस्टांना हटवून ममता बॅनर्जी सत्तेवर आल्या, पण बंगालमध्ये कोणताही बदल झाला नाही. आजही बंगालमध्ये घुसखोरी, तुष्टीकरण, राजकीय हिंसाचार आणि भ्रष्टाचार होत आहे. मी आज हाक देण्यासाठी आलो आहे की, २०२६ मध्ये भाजपचे सरकार बनवायचे असेल तर २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत त्याचा पाया घाला आणि मोदीजींना देशाचे पंतप्रधान करा.”
“बंगालमध्ये २७ वर्षे कम्युनिस्टांनी राज्य केले, तिसऱ्या टर्ममध्ये ममता बॅनर्जी यांचे सरकार स्थापन झाले. दोघांनी मिळून बंगालचा नाश केला. संपूर्ण देशात निवडणुकीतील हिंसाचार बंगालमध्ये सर्वाधिक आहे. ममता बॅनर्जी बंगालमधील घुसखोरी रोखू शकलेल्या नाहीत. राज्यात घुसखोरांना मतदार कार्ड आणि आधार कार्ड खुलेआम वाटले जात असून ममता बॅनर्जी गप्प बसल्या आहेत. ज्या बंगालमध्ये एकेकाळी पहाटे रवींद्र संगीत ऐकू येत होते, आज तोच बंगाल बॉम्बस्फोटांनी गुंजत आहे. संपूर्ण देशात गरिबी संपत आहे, पण बंगालमध्ये गरिबी कमी होत नाहीये.”
“भ्रष्टाचार शिगेला पोहोचला आहे. मोदींनी संपूर्ण देशातून दहशतवाद संपवला आहे. मोदींनी कलम ३७० रद्द केले, ज्यासाठी बंगालचे सुपुत्र श्यामा प्रसाद मुखर्जी यांनी काश्मीरमधून ते हटवण्यासाठी बलिदान दिले होते. डावा अतिरेक संपवला. चांद्रयान 3 च्या माध्यमातून भारताचा तिरंगा चंद्रावर पाठवण्यात आला. नवी संसद स्थापन करून देशाची अर्थव्यवस्था अकराव्या क्रमांकावरून पाचव्या क्रमांकावर नेली.” असं अमित शहा म्हणाले आहेत.