मुंबई : उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेतील काही लोकं, राष्ट्रवादी काँग्रेसमधील काही लोकं आणि काँग्रेसमधीलही काही लोकं देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांच्या संपर्कात आहेत, हे मी जबाबदारीने सांगतोय, असा गौप्यस्फोटच शिंदे गटाचे नेते आणि उद्योगमंत्री उदय सामंत यांनी केला आहे. १७२ पेक्षा जास्त म्हणजेच मेजॉरिटीचा विषयच नाही, असेही सामंत म्हणाले.
१६ मार्च रोजी शिंदे गट विरुद्ध ठाकरे गट यांच्यातील वादावर सुनावणी पूर्ण झाली. शिंदे गटाचे १६ आमदार पात्र ठरणार की अपात्र? याभोवती हे सगळं प्रकरण उभं राहिलं असून त्यावर सर्वोच्च न्यायालयाकडून उद्या किंवा परवा म्हणजेच ११ मे किंवा १२ मे रोजी निकाल येण्याची शक्यता वर्तवली जात आहे. अशातच उदय सामंत यांनी यासंबंधी मोठं विधान केलं आहे.
सत्तासंघर्षाच्या बाबतीत यापूर्वीही अनेकदा आम्ही सांगितलंय, आमची योग्य बाजू आम्ही सर्वोच्च न्यायालयात मांडली आहे. त्यावर, सर्वोच्च न्यायालयातील निर्णय देईल, असे उदय सामंत यांनी स्पष्ट केले. विशेष सरकारी वकील अॅड. उज्ज्वल निकम यांनी या सर्व प्रकरणावर प्रतिक्रिया दिली आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या पाच घटनापीठमधील एक न्यायाधीश १५ मे रोजी निवृत्त होत आहेत. त्यामुळे १२ मेपर्यंत राज्यातील सत्तासंघर्षावरील निकाल येण्याची शक्यता आहे, असं उज्वल निकम यांनी सांगितलं.