पुणे : मागील काही दिवसांत कांद्याचे दर मोठ्या प्रमाणात घसरले होते. त्यामुळे राज्यातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांना याचा मोठा फटका बसला होता. काही ठिकाणी दर मिळत नसल्याने शेतकऱ्यांनी अक्षरशः कांदा रस्यावर फेकून दिला होता. त्यातच मागील आठवड्याभरात कांद्याचे दर काही प्रमाणात वाढताना पाहायला मिळत असतानाच, आता केंद्र सरकारने कांदा निर्यातीवर 40 टक्के शुल्क लावल्यानंतर दर घसरण्याची शक्यता आहे.
हे निर्यात शुल्क 31 डिसेंबर 2023 पर्यंत लागू असणार आहे. केंद्र सरकारकडून याचे नोटिफिकेशन जारी करण्यात आले आहे. मात्र, सरकारच्या या निर्णयाचा शेतकऱ्यांना फटका बसण्याची शक्यता आहे. त्यामुळे राज्यात मोठा संताप पाहायला मिळत आहे. दरम्यान, यावर कृषिमंत्री धनंजय मुंडे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. मी केंद्राच्या संपर्कात आहे, गरज पडल्यास दिल्लीला जाणार. असं धनंजय मुंडे म्हणाले आहेत.
केंद्र सरकारने कांदा निर्यातीवर 40 टक्के शुल्क लावल्यानंतर शेतकऱ्यांमध्ये तीव्र संतापाची लाट निर्माण झाली असून, तात्काळ केंद्र सरकारने निर्यात शुल्क रद्द करावा, अशी मागणी शेतकऱ्यांकडून केली जात आहे. यावर धनंजय मुंडे यांनी देखील आपली प्रतिक्रिया दिली असून, कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या प्रश्नावरून मी केंद्रीय मंत्र्यांच्या संपर्कात असल्याचे म्हटले आहे. तर, वेळ पडल्यास शेतकऱ्यांचा हितासाठी दिल्लीला जाऊन केंद्रीय कृषी मंत्र्यांची भेट घेणार असल्याचे धनंजय मुंडे म्हणाले आहेत. तसेच, कांदा उत्पादक शेतकऱ्यांचे नुकसान होणार नाही, यासाठी नक्कीच आम्ही मार्ग काढू असा विश्वास देखील धनंजय मुंडे यांनी शेतकऱ्यांना दिला आहे.