तरुण भारत लाईव्ह । १५ ऑक्टोबर २०२३। नागपूर मधून एक धक्कदायक बातमी समोर आली आहे. होमवर्क न केल्याने शिक्षकांनी दुसरीत शिकणाऱ्या विद्यार्थिनीला कानातून रक्त येईपर्यंत मारहाण केल्याची घटना घडली आहे. पिराजी मायगु चाचेरकर असे या शिक्षकांचे नाव आहे.
सूत्राने दिलेल्या माहितीनुसार, नागपुरातील रामदासपेठ परिसरातील सोमलवार इंग्रजी प्राथमिक शाळेत इयत्ता दुसरीत शिकणाऱ्या एका विद्यार्थिनीने शिक्षकांनी सांगितलेला गृहपाठ केला नव्हता. त्यामुळे संतापलेल्या शिक्षकाने विद्यार्थिनीला झापड मारली. ज्यामुळे त्या विद्यार्थिनीच्या कानातून रक्त येऊ लागले. या घटनेनंतर शाळेतील एका शिक्षिकेने विद्यार्थिनीच्या आईला फोन करून याबाबत कळवले. तिची आई शाळेत पोहचली तेव्हा मुलगी खूप रडत होती. त्यानंतर मुलीच्या काकांनी तिला धीर देत प्रेमाने विचारणा केली असता तिला शिक्षकाने होमवर्क न केल्यामुळे मारहाण केल्याचे तिने सांगितले.
याआधी सुद्धा या शिक्षकाने इतर विद्यार्थिनींना देखील अशा प्रकारची मारहाण केल्याची माहिती पुढे आली. मात्र ते पोलिसांपर्यंत आली नाही. ते प्रकरण शाळेतच संपविण्यात आले होते. या शिक्षकाच्या विरोधात यापूर्वीही काही तक्रारी आल्या होत्या. त्याची चौकशी सुरू असतानाच हा प्रकार घडला आहे. याप्रकरणी योग्य ती कायदेशीर कारवाई केली जाईल, असे शाळा प्रशासनाकडून सांगण्यात आले.