कारागृहाबाहेरही दहशतवाद्यांवर राहणार नजर, पोलीसांनी घेतला ‘हा’ निर्णय

जामिनावर सोडल्यानंतरही दहशतवाद्यांवर आता कडक नजर ठेवण्यात येणार आहे. त्यासाठी त्यांच्या पायाला जीपीएस ट्रॅकर बसवण्यात येणार आहे. जम्मू-काश्मीर पोलीसांनी हा निर्णय घेतला असून अशा प्रकारचा निर्णय घेणारे ते देशातील पहिले पोलीस दल बनले आहे.
जीपीएस ट्रॅकर हे एक उपकरण आहे. हे उपकरण अमेरिका, युनायटेड किंगडम, दक्षिण आफ्रिका, ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंड यासारख्या देशांमध्ये जामीनावर जाणाऱ्या कैद्यांसाठी वापरले जाते. एखाद्या व्यक्तीच्या पायाला जीपीएस ट्रॅकर अडकवल्यानंतर तो व्यक्ती जिथे जाईल तिथली माहिती ऑपरेटरला मिळते.
पाश्चात्य देशांमध्ये हे उपकरण नजरकैदेत असलेल्या कैद्यांवर लक्ष ठेवण्यासाठी देखील वापरले जाते. एनआयएच्या विशेष न्यायालयाने जम्मू-काश्मीर पोलिसांना एका दहशतवाद्यावर नजर ठेवण्यासाठी त्याच्यावर जीपीएस ट्रॅकर बसवण्याचे निर्देश दिले होते.
गुलाम मोहम्मद भट्ट या दहशतवाद्यावर हा ट्रॅकर पहिल्यांदा वापरण्यात आला आहे. गुलाम मोहम्मद भट्ट दहशतवादी संघटनेत सामील होण्याच्या आणि कट रचल्याच्या आरोपाखाली दोषी ठरवले आहे. त्यामुळे न्यायालयाने पोलिसांना त्याच्यावर कडक नजर ठेवण्यास सांगितले होते. त्यानंतर सरकारी वकिलांच्या युक्तिवादानंतर न्यायालयाने त्याच्यावर जीपीएस ट्रॅकर बसविण्याचे निर्देश दिले.