कार्यालयात घुसून तलाठ्याची हत्या; राज्यभरात खळबळ, पाचोऱ्यात तीव्र निषेध

पाचोरा : सरकारी कार्यालयात घुसून एका तलाठ्याची हत्या करण्यात आल्याची घटना बुधवार, 28 रोजी हिंगोलीच्या वसमत तालुक्यात घडली. या खुनाचे पडसाद आज राज्यभर पाहायला मिळत आहेत. या घटनेचा पाचोरा तालुका तलाठी संघाने तीव्र निषेध व्यक्त केला. पवार यांच्या कुटुंबीयांना शासनाकडून ५० लाखाची मदत मिळवी, अशी मागणी उपविभागीय अधिकारी, नायब तहसिलदार यांच्याकडे निवेदनाद्वारे केली.

मिळालेल्या माहितीनुसार, वसमत तहसील कार्यालयांतर्गत संतोष पवार हे तलाठी म्हणून कार्यरत होते. त्यांना आडगाव रंजेबुवा आणि बोरीसावंत हे दोन तलाठी सज्जे देण्यात आले होते. मागील तीन वर्षापासून ते या सज्जाचे काम पाहत होते. दरम्यान, बुधवार, 28 रोजी तलाठी पवार हे नेहमीप्रमाणे आडगाव रंजेबुवा तलाठी सज्जा कार्यालयात कामकाज करीत बसले होते. बोरी सावंत येथील एक तरुण दुचाकीवरून कार्यालयात आला. यावेळी त्याने तलाठी पवार यांच्याशी फेरफारावरून बाचाबाची करण्यास सुरवात केली. अचानक त्या तरुणाने काही कळण्याच्या आत तलाठी पवार यांच्या डोळ्यात मिरचीची पूडी टाकली आणि चाकू हल्ला केला. यावेळी पोटात चाकूचे वार झाल्यामुळे तलाठी पवार घाबरले. अतिरक्तस्त्राव झाल्यामुळे जागेवरच कोसळले. त्यानंतर तरुणाने दुचाकीवरून धूम ठोकली. या घटनेनंतर आरडाओरड झाल्याने गावकरी तेथे एकत्र आले. गावकऱ्यांनी तलाठी पवार यांना उपचारासाठी परभणीच्या शासकिय रुग्णालयात नेले. मात्र उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला.

या खुनाचे पडसाद आज राज्यभर पाहायला मिळत आहेत. तलाठी महासंघाच्या वतीने आज राज्यभर काम बंद आंदोलनाची हाक देण्यात आली. या घटनेचा पाचोरा तालुका तलाठी संघाने तीव्र निषेध व्यक्त केला. पवार यांच्या कुटुंबीयांना शासनाकडून ५० लाखाची मदत मिळवी, अशी मागणी उपविभागीय अधिकारी, नायब तहसिलदार यांच्याकडे निवेदनाद्वारे केली. यावेळी पाचोरा तालुका तलाठी संघटनेचे अध्यक्ष नदीम शेख, सचिव दीपक दवंगे तसेच तलाठी संघटनेचे सर्व सभासद आदी उपस्थित होते.