तरुण भारत लाईव्ह ।७ सप्टेंबर २०२३। नाशिक जिल्ह्यातील इगतपुरी तालुक्यातून एक हृदयद्रावक बातमी समोर आली आहे. दोन वर्षीय चिमुकली घरात खेळत असताना अंगावर उकळते पाणी पडल्याने गंभीर भाजलेल्या या चिमुकल्या मुलीचा दुर्देवी मृत्यू झाल्याची घटना घडली. जयश्री तुकाराम सिद असे या चिमुकलीचे नाव आहे. या घटनेने सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे.
सूत्राने दिलेल्या माहितीनुसार, जयश्री हि घरात खेळत होती. त्यावेळी घरातील चुलीवर असलेले उकळते पाणी तिच्या अंगावर पडले यामध्ये ती गंभीररीत्या भाजली गेली. तात्काळ तिला वाडीवऱ्हे इथे उपचारासाठी दाखल करण्यात आले. यानंतर तिला जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले मात्र उपचार सुरु असताना तिचा मृत्यू झाला.
दरम्यान या दोन वर्षाच्या चिमुकलीचा मृत्यू झाल्याने इगतपुरी तालुक्यातील सिद कुटुंबावर मोठा दुःखाचा डोंगर कोसळला असून गावावर सर्वत्र शोककळा पसरली आहे. याबाबत वाडीव-हे पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.