मुंबई : शिवसेना व राष्ट्रवादीनंतर आता भविष्यात काँग्रेसही फुटणार असा दावा शिवसेना आमदार संजय शिरसाट यांनी केला आहे. त्यामुळे राज्यात पुन्हा भूकंप होणार का अशी चर्चा सुरू झाली आहे. आमदार संजय शिरसाट म्हणाले की, काँग्रेस फुटणार हे नक्की, विस्तार लवकरच होतील. त्यात शिवसेना-भाजपाच्या आमदारांना मंत्रिपदाची शपथ दिली जातील. काँग्रेस कधी फुटेल याची वाट पाहावी लागेल. आम्ही संजय राऊत नाही. संजय शिरसाट आहे जे बोलेल ते सत्य आहे. काही काळानंतर काँग्रेसचा मोठा गट आमच्यासोबत दिसेल असं त्यांनी सांगितले.
अलीकडेच राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांच्यासह दिग्गज ८ नेते मंत्रिमंडळात समाविष्ट झाले. त्यामुळे शिवसेनेतील आमदार नाराज असल्याची चर्चा सुरु झाली. मात्र आमच्यात कुठलीही नाराजी नाही असंही स्पष्टीकरण शिरसाट यांनी दिले आहे. शिवसेनेच्या बैठकीत आमदार भिडल्याच्या चर्चेवर शिरसाट म्हणाले की, शिवसेनेच्या बैठकीत काही घडलं नाही. बैठकीत राजकीय परिस्थितीबाबत महिती देण्यात आली.
येणार्या निवडणुकीत काय रणनीती असावी यावर चर्चा झाली. आमदारांच्या अडीअडचणी समजून घेतल्या. आमदारांमध्ये वाद अत्यंत चुकीची आणि खोटारडी बातमी आहे. जे घडले ते सांगणारे आम्ही आहोत. जे घडलेच नाही ते सांगितले जाते. बोकांडी बसून मंत्रिपदे घेणारी माणसे नाही, असा खुलासा त्यांनी केला.
ठाकरे गटाच्या संपर्कात कुणीही नाहीत. विनायक राऊत-संजय राऊत फेकाफेकी करत असतात. तुमच्याकडे कुणी येणार नाही. जे आहेत ते सांभाळा, जे असतील ते इकडे कधी येतील सांगता येणार नाही. थोडे दिवस थांबा. आम्ही केलेला उठाव आणि अजित पवारांनी केलेला उठाव यात साम्य आहे. कार्यकर्त्यांना मोठे होऊ द्यायचे नाही ही नेत्यांची मानसिकता असते त्याला दिलेला तो छेद आहे.
अजित पवारांसोबत आलेले कमकुवत नेते नाहीत. प्रफुल पटेल सारखा नेता केंद्रीय पातळीवर मंत्रिपद सांभाळलेले आहेत. भुजबळ, वळसे पाटील मोठे नेते आहेत. यांनीही खोके घेतलेत का? करमणुकीसाठी हे आरोप लावले जातात. ज्यांना पक्ष सांभाळता आला नाही ते अशाप्रकारे घोषणा करतात. त्यामुळे हे खोटारडे आहेत लोकांना कळाले असा घणाघात शिरसाट यांनी विनायक राऊत आणि संजय राऊतांवर केला.