Maharashtra Politics : शिवसेना (उबाठा) पक्षाचे खासदार संजय राऊत हे लोकसभा निवडणूक लढण्याच्या तयारीत असल्याच्या चर्चेमुळं महाराष्ट्रातील राजकीय आखाडा चांगलाच तापला आहे. दरम्यान, भाजपचे नेते गिरीश महाजन यांनी राऊत यांना थेट आव्हान दिले आहे.
संजय राऊत लोकसभा निवडणूक लढवणार असल्याच्या चर्चा राजकीय वर्तुळात घोंघावू लागल्या. त्यानंतर काही वेळातच राज्यात मोठं राजकीय वादळ उठलं. ईशान्य मुंबईतून ते निवडणूक आखाड्यात उतरू शकतात, असं बोललं जातं. विरोधी पक्षांमधील नेत्यांकडून त्यांच्यावर जोरदार शाब्दिक हल्ले चढवले जात आहेत.
काही लोकांचे खायचे आणि दाखवायचे दात वेगळे असतात. त्यांना बोलायला काय जातं. असं असेल तर त्यांनी निवडणूक लढवून दाखवावी, असं आव्हान शिंदे गटाचे आमदार भरत गोगावले यांनी राऊत यांना दिलं होतं. तर भाजपच्या नेत्यांकडूनही राऊतांवर टीका होऊ लागली आहे.
संजय राऊत यांनी ईशान्य मुंबईतून लोकसभा निवडणूक लढवूनच दाखवावी. किती मतं मिळतात हे तपासून बघावं. ते नगरपालिका, महापालिका निवडणूक लढलेले नाहीत, असं असताना नुसत्या गप्पा मारणं सोपं असतं, अशा शब्दांत भाजप नेते गिरीश महाजन यांनी राऊतांवर टीकेचा बाण सोडला.