किरकोळ भांडणावरून पत्नीला आयुष्यातून उठवलं, पतीला जन्मठेप

धुळे :  किरकोळ कारणावरून पतीने पत्नीचा लोखंडी फावड्याने खून केल्याची घटना येथील लेबर कॉलनी भागात घडली होती. याप्रकरणी जिल्हा व सत्र न्यायाधीश डी.एल. भागवत यांनी आरोपीस जन्मठेपेसह एक हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली. दंड न भरल्यास एक महिन्याची सक्त मजुरीचा शिक्षा सुनावली.

सांजिली सुरेंद्र सोरेन व तिचा पती सुरेंद्र सोरेन ऊर्फ चंद्राई लक्ष्मीनारायण मुरमू हे दाम्पत्य दि.५ सप्टेंबर २०१८ रोजी चक्करबर्डी येथे सुरू असलेल्या बांधकामावर कामासाठी आले होते. ते लेबर कॉलनीतील सांजिली सोरेन हिच्या भावाच्या घरी आल्यानंतर रात्री घरात झोपले होते. सांजिली व पती सुरेंद्र सोरेन यांच्यात किरकोळ भांडण झाले. या भांडणात सुरेंद्र सोरेन याने सांजिली हिच्या डोक्यात लोखंडी फावडीने वार करून तिची निघृण हत्या केली.

याप्रकरणी मृत सांजिलीचा भाऊ मोहन मुरमू याने शहर पोलिस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून सुरेंद्र सोरेनविरुद्ध भादंवी कलम ३०२ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता. तत्कालीन तपास अधिकारी सहायक पोलिस निरीक्षक विलास ठाकरे यांनी घटनेचा तपास करून न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले. यात सरकार पक्षातर्फे ७ साक्षीदार तपासण्यात आले.

मृत सांजिली हिच्या अंगावर मृत्यूवेळी मारहाणीच्या एकूण १२ जखमा असल्याचे डॉ. गढरी यांनी नमूद केले. या खटल्यात सरकार पक्षातर्फे अतिरिक्त सरकारी अभियोक्ता अॅड. गणेश वाय पाटील यांनी युक्तीवाद केला. जिल्हा व सत्र न्यायाधीश डी.एल. भागवत यांनी आरोपी सुरेंद्र सोरेन यास खुनाच्या गुन्ह्यात दोषी ठरवून जन्मठेप, तसेच १ हजार रुपयांच्या दंडाची शिक्षा सुनावली. दंड न भरल्यास एक महिन्याची सक्त मजुरीचा शिक्षा असा निकाल दिला आहे. अॅड. गणेश पाटील यांना जिल्हा सरकारी वकील अॅड. देवेंद्रसिंह तंवर यांचे मार्गदर्शन लाभले. पैरवी अधिकारी म्हणून हेड कॉन्स्टेबल बी. जे. चव्हाण यांनी काम पाहिले.