जळगाव : कीर्तनाचा कार्यक्रम आटोपल्यानंतर बहिणीकडे निघालेल्या कीर्तनकारावर काळाने झडप घातली. अज्ञात वाहनाने धडक दिल्यानंतर कीर्तनकार कैलास प्रकाश कोळी (२२, रा. खर्डी, ता. चोपडा) हे ट्रकखाली अडकले व त्यात त्यांचा मृत्यू झाला. ही घटना शिरसोली ते जळगावदरम्यान सेंट सा शाळेजवळ घडली.
चोपडा तालुक्यातील खर्डी येथे आपल्या परिवारासह वास्तव्यास असलेले कैलास कोळी हे कीर्तनकार असून कीर्तन करून आपला उदरनिर्वाह करत होते. शनिवार २३ डिसेंबर रोजी त्यांचे पाचोरा येथे कीर्तनाचा कार्यक्रम आयोजन करण्यात आले होते. रात्री ११ वाजता कीर्तन संपल्यानंतर ते दुचाकीने चोपडा येथे येत असताना जळगाव शहरानजीकच्या शिरसोली रस्त्यावर रात्री १२.३० वाजता गॅसच्या टँकरने त्यांच्या दुचाकीला भीषण धडक दिली.
धडकेत त्यांचा उजवा पाय कापला गेला. तर आजूबाजूच्या नागरिकांनी व मंत्री गिरीश महाजन यांचे आरोग्यदूत शिवाजी पाटील यांनी त्याला शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. तेथे उपचार सुरु असताना पहाटे कैलास कोळी यांचा मृत्यू झाला आहे. नातेवाईकांनी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात धाव घेऊन एकच आक्रोश केला. रविवारी २४ डिसेंबर रोजी सकाळी १० वाजता शवविच्छेदन करून मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला आहे. त्यांच्या पश्चात आई-वडील, भाऊ, दोन विवाहित बहीण आणि असा परिवार आहे. एमआयडीसी पोलीस स्टेशनला घटनेची नोंद करण्यात आली आहे.