मुंबई । राज्यातील वातावरणात सातत्यानं बदल होत आहे. एकीकडे राज्यातील अनेक ठिकाणी तापमान ४०-४१ अंशावर गेल्याने उकाडा मोठ्या प्रमाणात वाढला आहे. यामुळे नागरिक हैराण झाले आहे. यातच हवामान खात्याने राज्यातील काही ठिकाणी उष्णतेची लाट येणार आहे, असं म्हटलं आहे. तर काही ठिकाणी अवकाळी पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे.
कुठे तापमान वाढ?
चक्रवाताच्या स्थितीमुळे अरबी समुद्रावरून गुजरातकडे आर्द्रतायुक्त उष्ण वारे वाहत आहे. हे वारे गुजरातवरून महाराष्ट्राच्या किनारपट्टीकडे येत आहे. त्यामुळे मुंबई पालघरसह कोकणाच्या तापमाणात वाढ होण्याचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे. मुंबई शहरासह रायगड, ठाणे, पालघरमध्ये हवेतील आर्द्रता वाढणार आहे. त्याचा परिणाम होऊन या भागातील उकाडा वाढणार आहे. तसेच विदर्भातील यवतमाळ, अकोला, चंद्रपुरात पुढील तीन दिवस उष्णतेची लाट येणार आहे, असे हवामान विभागाने म्हटले आहे. यामुळे नागरिकांना काळजी घेण्याचे आवाहन केले आहे. संपूर्ण विदर्भात कमाल-किमान तापमान वाढीसह रात्री उकाडा वाढण्याचाही अंदाज आहे.
कुठे पावसाची शक्यता?
एकीकडे तापमान वाढत असताना दुसरीकडे विदर्भ, मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात पुढील तीन दिवस तुरळक पाऊस पडण्याची शक्यता आहे. दरम्यान, जळगाव जिल्ह्यात देखील दिवसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे. आजपासून पुढचे तीन दिवस जिल्ह्यात तुरळक पावसाची शक्यता हवामान खात्याने वर्तविली आहे.