पारोळा : तालुक्यात वादळी वारा, गारपीट मोठ्या प्रमाणात झाल्यानेमक्का, ज्वारी, हरभरा, गहू,टरबूज जमिनीदोस्त झाले असून, निंबूसह फळबागांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. दरम्यान, महाराष्ट्र शेतकरी संघटनेचे अध्यक्ष नेते सुनील देवरे यांनी या परिसरात झालेल्या नुकसानाची पाहणी केली.
शेतकऱ्यांचे शंभर टक्के नुकसान झाले असताना कोणताही शासकीय अधिकारी पंचनामा करिता आलेले दिसून आले नाहीत. प्रत्येक वेळेस शासनाची उदासीनता दिसून येते, कापूस हमी भावापेक्षा कमीने विकावा लागत आहे, बी बियाणे खते बाबतीत वाढलेल्या किंमतीमुळे शेतकरी अडचणीत आहे,तर रात्री ची गारपिटीमुळे नुकसान झाले अजूनही अधिकारी बांधावर आलेले नाहीत हे सर्व पाहता शेतकऱ्यांना सर्व बाजूंनी आडवे पडून अनोखे आंदोलन केले.
सुनील देवरे यांच्या नेतृत्वात महाराष्ट्र शेतकरी संघटनेच्या माध्यमाने महाळपुर येथे गारपिटामध्ये नुकसान झालेल्या मका पिकाच्या शेतात शेतकऱ्यांनी आडवे पडून शासनाचा निषेध व्यक्त करत आंदोलन केले. झालेल्या नुकसानीच्या सरसकट पंचनामा करण्यात यावा, झालेली नुकसान भरपाई एक महिन्याच्या आत शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्यात यावी, पिकपेरा न पाहता ज्या शेतामध्ये ज्या पिकाचे नुकसान झालेले आहे त्याचा सरसकट पंचनामा करण्यात यावा, कोणतेही जाचक निकष लावण्यात येऊ नयेत अशी मागणी शेतकरी नेते सुनील देवरे यांनी या आंदोलनावेळी केली.
आंदोलनात पारोळा तालुका कार्याध्यक्ष गुलाब पाटील कंकराज चे सरपंच राजाराम पाटील,शाखा प्रमुख हर्षल पाटील,कार्याध्यक्ष ललित पाटील, महाळपुर आरोग्य प्रमुख देवेंद्र पाटील यांच्यासह महाळपूर, शिरसोदे,बहादपुर,कंकराज या परिसरातील नुकसानग्रस्त शेतकरी शेकडोच्या संख्येने आंदोलनात सहभागी झाले होते.