टीम इंडियाने दक्षिण आफ्रिका टीमवर 243 धावांच्या फरकाने मात करत वर्ल्ड कप 2023 मधील सलग आठवा विजय नोंदवला. विशेषतः विराट कोहली याने नाबाद 101 धावांची शतकी खेळी केली. विराटने या 49 व्या एकदिवसीय शतकासह सचिनच्या सर्वाधिक शतकांच्या विक्रमाची बरोबरी केली. त्यानंतर जगभरातील आजी-माजी क्रिकेटपटूंसह क्रिकेटप्रेमींकडून विराटवर कौतुकांचा वर्षाव झाला. मात्र यावेळी श्रीलंकेचा कर्णधार कुसल मेंडिस याने विराटबाबत वादग्रस्त विधान केले होते. आता त्याला उपरती झाली असून, त्याने आता माफी मागितली आहे.
मेंडिस म्हणाला, ‘मला माहित नव्हते की, विराट कोहलीने त्याचे ४९ वे वनडे शतक झळकावले आहे. मला पत्रकार परिषदेत अचानक प्रश्न विचारण्यात आला. मला प्रश्न समजला नाही. वन-डे क्रिकेटमध्ये ४९ शतके करणे सोपे नाही. त्यावेळी मी बोललो ते चुकीचे होते.
दरम्यान, पत्रकार परिषदेत मेंडिसला विचारले की, कोहलीला त्याच्या ४९ व्या वनडे शतकाबद्दल अभिनंदन करायचे आहे का? यावर मेंडिस म्हणाला, “मी त्याचे अभिनंदन का करू?” मेंडिसने उत्तर दिले आणि हसायला लागला. या उत्तराचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. यानंतर मेंडिसवर टीकेची झोड उठली होती. आता त्याला आपल्या विधानाचा पश्चाताप झाल्याने त्याने मी बोललो ते चुकीचे होते, असे सांगत या वादावर पडदा टाकला आहे.