वैभव करवंदकर
नंदुरबार : कृत्रिम बुद्धिमत्ता हे क्षेत्र झपाट्याने विकसित होऊन नवनवीन बदल पहावयास मिळत आहे. आगामी काळात पाण्याच्या सहाय्याने हायड्रोजनवर आधारित वाहने रस्त्यांवर धावताना दिसतील. संशोधन क्षेत्रात नवीन दालने उदयास येत असून त्यांच्या विकासाच्या दिशा विस्तारत आहेत. नॅनो कण व पदार्थ बनविण्याचे कार्य व पध्दती, वापरात येणारे तंत्रज्ञान या विषयी माहित देताना म्हणाले की शेतकऱ्यांनंतर देशाची खरी सेवा पुरविणारा क्रमांक दोनचा घटक संशोधक आहे. येणारा काळ नॅनो टेक्नॉलॉजी व त्याद्वारे निर्मित उपकरणांच्या सहाय्याने सर्वाधिक सुंदर व सुकर होणार असल्याचे प्रतिपादन आंतरराष्ट्रीय दर्जाचे तज्ञ व्याख्याते ज्येष्ठ नॅनो संशोधक अमळनेर येथील प्रताप महाविद्यालयाचे माजी प्राचार्य डॉ. एल. ए. पाटील यांनी केले.
पी. एम. श्री जवाहर नवोदय विद्यालय, श्रावणी ता. नवापूर जिल्हा नंदुरबार येथे राष्ट्रीय अविष्कार अभियानांतर्गत प्रगत सोसायटी मध्ये नॅनो टेक्नॉलॉजी चे महत्त्व या विषयावर आंतरराष्ट्रीय दर्जाचे तज्ञ व्याख्याते ज्येष्ठ नॅनो संशोधक माजी प्राचार्य, डॉ. एल. ए. पाटील, यांचे व्याख्यान आयोजित करण्यात आले. कार्यक्रमाचे अध्यक्ष स्थान. विद्यालयाचे प्राचार्य पी. आर. कोसे यांनी भूषविले. तसेच नवापूर येथील वरिष्ठ महाविद्यालयातील प्रा. डॉ. आय. जी. पठाण प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते.
डॉ. एल. ए. पाटील म्हणाले की, स्मार्ट मटेरियल बनविण्याचे कार्य नॅनो टेक्नॉलॉजी मुळे जोर धरत आहे. जगाच्या पाठीवर अनेक देशांमध्ये नॅनोवर आधारित तंत्रज्ञान विकसित होत आहे. त्या क्षेत्रात दरदिवशी नवनवीन संशोधनाला आकार मिळत आहे. या तंत्रज्ञानाच्या सहाय्याने दुर्धर व असामान्य आजारावर माफक उपचार मिळणार आहे. कृषी क्षेत्रात आमुलाग्र बदल होऊन क्रांती घडून येणार आहे. साधनांचा आकार कमी होऊन त्यांची क्षमता व उपयोग वाढणार आहे. वाहनांचा आकार कमी होउन त्यांचे स्वरूप बदलणार आहे तर दुसरीकडे त्यांची उपयोगिता वाढणार आहे.
प्राचार्य पी. आर. कोसे म्हणाले की, विद्यार्थ्यांना चांगले विचार आत्मसात करून जीवनात यशस्वी व्हावे असा सल्ला दिला. निरीक्षणातील सातत्य जीवनात उपयुक्त असल्याचे उदाहरण देऊन त्यांनी स्पष्ट केले. नॅनो क्षेत्र हे विद्यालयातील विद्यार्थ्यांना अनभिज्ञ होते. व्याख्यानाच्या माध्यमातून ते क्षेत्र विद्यार्थ्यांना सुपरिचित झाले. नॅनो क्षेत्राचे उत्पादन प्रत्यक्षात लोकांसाठी उपलब्ध झाल्यावर लोकांची जीवनशैली बदलल्या शिवाय राहणार नाही असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. व्याख्यानास विद्यालयातील वरिष्ठ शिक्षक बी. एस. पवार तसेच सर्व शिक्षक तथा विद्यार्थी उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक जे. एन. चव्हाण यांनी केले व एस. एन. जाधव यांनी आभार मानले.
नॅनो टेक्नॉलॉजीमुळे ग्रामीण क्षेत्रात देखील संशोधन करणे शक्य आहे. इच्छा शक्ती बाळगून प्रयत्नांमध्ये सातत्य ठेवल्यास उत्तम दर्जाचे संशोधन करणे ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना शक्य आहे. – प्रा. डॉ. आय. जी. पठाण , नवापूर