कृषी विभाग : जळगावात केळी पीकाबाबत सुसंवाद कार्यक्रम

 

जळगाव : बाळासाहेब ठाकरे कृषी व्यवसाय ग्रामीण परिवर्तन प्रकल्प (स्मार्ट) व कृषि तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा (आत्मा) अंतर्गत दिनांक 12 मार्च 2024 रोजी परिश्रम हॉल, जळगाव येथे केळी पीक उत्पादन तंत्रज्ञान व बाजार माहिती संमेलन ( टेक मार्केट मीट) व शेतकरी शास्त्रज्ञ सुसंवाद कार्यक्रमाचे आयोजन प्रकल्प संचालक, आत्मा जळगाव याचे मार्फत करण्यात आले होते.

या संमेलनासाठी सुनील वानखेडे, विभागीय नोडल अधिकारी, स्मार्ट नाशिक, डॉ. के बी पाटील शास्त्रज्ञ, जैन इरिगेशन, जळगाव, सदानंद महाजन, भागवत पाटील अध्यक्ष केळी उत्पादक महासंघ, डॉ. बी.डी.जडे, रविशंकर चलवदे, प्रकल्प संचालक, आत्मा जळगाव, कुरबान तडवी, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, जळगाव, नाबार्डचे, श्रीकांत झांबरे, अनिल भोकरे तसेच, निर्यातदार, खरेदीदार, केळी पीक उत्पादक प्रगतीशील शेतकरी, बैंक अधिकारी तसेच जिल्हाभरातून केळी उत्पादक शेतकरी उपस्थित होते.

केळी पिकाच्या मूल्य साखळी मधील सध्याची परिस्थिती व त्यामध्ये अपेक्षित बदल सुचविण्यासाठी सर्व संबंधितांना एकच मंचावर बोलविण्यात आले होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक रविशंकर चलवदे यांनी केले. त्यावेळी त्यांनी शेतकरी उत्पादक कंपनीची स्थापना, तसेच स्मार्ट प्रकल्पाच्या जिल्हयाच्या प्रगती बाबत माहिती दिली. सुनील वानखेडे यांनी आपले मार्गदर्शनात स्मार्ट प्रकल्पाच्या बाबींविषयी विस्तृत महिती दिली. तसेच संमेलनात सहभागी सर्वांचे वेगवेगळे गट तयार करून त्यांच्याकडून आलेल्या सूचनांनुसार प्रस्तावित मूल्य साखळी कशी असावी, याविषयी मार्गदर्शन केले.

डॉ. किरण जाधव सोलापूर यांनी जिल्ह्यात केळी लागवड 7 X 5 फुटावर करण्याचे फायदे व आलेले उत्पादन याविषयी माहिती दिली. तसेच केळी पिकासाठी मल्चिंग बेडवर लागवड, फर्टिगेशन शेड्युल प्रमाणे खत देणे व घड व्यवस्थापन याविषयी मार्गदर्शन केले.

केळी निर्यातीमधील जळगाव जिल्हयातील सध्या स्थिती व संधी याविषयी विशाल अग्रवाल यांनी माहिती दिली. यावेळी केळी तज्ञ डॉ. के. बी. पाटील यांनी केलेल्या मार्गदर्शनात, कोल्ड स्टोरेज पॅक हाऊस इत्यादीची व्यवस्था जिल्हयात शेतकरी उत्पादक कंपन्यांमार्फत निर्माण झाल्यास केळी 45 दिवसापर्यंत टिकवून ठेवता येणे शक्य आहे व आंतरराष्ट्रीय बाजारात जळगाव चे अस्तित्व टिकवून ठेवण्यासाठी व्यापक संधी आहे, रेल्वे वॅगन मधून केळी वाहतूक ही आता जवळपास बंद झालेलो आहे, देशांतर्गत विक्रीमध्ये सुद्धा बॉक्स रेट पॅकिंग करून केळी विकली जात आहे, त्यामुळे नवीन तंत्रज्ञान सर्व शेतकऱ्यांनी अवगत केले तरच जळगावच्या केळीची वेगळी ओळख आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत टिकवून ठेवणे शक्य आहे असे सांगितले. निर्यातदारांची सोलापूर जिल्ह्यातील केळीला पसंती ही त्यांच्या क्वालिटीमुळे व वाहतूक खर्चातील बचतीमळे आहे. जिल्हयातील निर्यात वाढविण्यासाठी वाहतूक खर्च दर दोन रुपयांनी कमी करून तडजोड करता येईल, तरीदेखील उत्पादक शेतक-यांना त्याचा लाभ होऊ शकतो. मागील वर्षी इतिहासात कधी नव्हे 32 रुपये किलो प्रमाणे दर मिळाला परंतु हा देखील भविष्यातील संधी बघता निम्म्यापेक्षा कमी आहे.

शेतक-यांनी इतर घटकांकडून अपेक्षा व्यक्त करताना जिल्ह्यात ड्राय पोर्ट व्हावा, केळीचा बेबी फूड म्हणून समावेश करावा, केळी घड व्यवस्थापनासाठी शासनामार्फत अनदान मिळावे, केळी खाणे विषयी जनजागृती पर जाहिराती प्रसिद्ध व्हाव्या, निर्यातक्षम केळी उत्पादनासाठी एखादा देश टार्गेट करून चार-पाच गावे मिळून व शेतकरी उत्पादक कंपनीच्या माध्यमातून नियोजन व्हावे अशा अपेक्षा व्यक्त केल्या.प्रकल्प उपसंचालक आत्मा पा. फ साळवे यांनीही मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन दादाराव जाधवर नोडल अधिकारी स्मार्ट जळगाव यांनी केले.