मुंबई : टीम इंडियाचा आतापर्यंतचा सर्वात यशस्वी कर्णधार महेंद्रसिंग धोनीच्या नेतृत्वात चेन्नई सुपर किंग्जने पाचव्यांदा आयपीएलचा किताब पटकावला. परंतु आयपीएलवेळी जखमी झालेल्या महेंद्र सिंग धोनीची गुरुवारी सर्जरी करण्यात आली आहे. धोनीच्या गुडघ्यावर मुंबईच्या कोकिलाबेन रुग्णालयात ऑपरेशन झाले. विशेष बाब म्हणजे गुरुवारी सोशल मीडियावर एक फोटो चांगलाच व्हायरल झाला आहे. ज्यामध्ये चेन्नई सुपर किंग्जचा कर्णधार एमएस धोनी कारमध्ये बसून भगवत गीता पठण करताना दिसला. धोनीने हातात भगवत गीता पकडून गाडीत बसल्याचे फोटोमध्ये दिसत आहे. त्यामुळे हा फोटो चांगलाच व्हायरल झाला आहे.
आयपीएल टूर्नामेंटच्या पहिल्याच मॅचवेळी धोनीला दुखापत झाली होती. गुजरातविरोधात मॅच खेळताना धोनी जखमी झाला. या मॅचच्या १९ व्या षटकांत दीपक चाहरने टाकलेला चेंडू अडवण्यासाठी धोनीने डाइव टाकली. त्यानंतर धोनीला ही दुखापत झाली. धोनीच्या गुडघ्याला गंभीर दुखापत झाली त्यानंतर कसेतरी तो उभा राहिला. काहीवेळ आराम केल्यानंतर तो पुन्हा विकेट किपिंगसाठी आला.
मीडिया रिपोर्ट्सनुसार, धोनी बुधवारी मुंबईच्या कोकिलाबेन धीरूभाई अंबानी हॉस्पिटल आणि मेडिकल रिसर्च इन्स्टिट्यूटमध्ये त्याच्या गुडघ्यावर उपचार घेण्यासाठी आला होता. आता त्याच्यावर गुरुवारी शस्त्रक्रिया होऊ शकते. धोनीने डॉ दिनशॉ परडीवाला यांची भेट घेतली आहे. दिनशॉ हे स्पोर्ट्स ऑर्थोपेडिक्सचे तज्ज्ञ तसेच हॉस्पिटलमधील स्पोर्ट्स मेडिसिनचे संचालक आहेत. ते दिल्ली कॅपिटल्सचा कर्णधार पंतवरही उपचार करत आहे.
मुंबईला जाण्यापूर्वी धोनीने चेन्नई सुपर किंग्जच्या व्यवस्थापनाशी याबाबत चर्चा केली. फ्रँचायझीने त्यांचे टीम फिजिशियन डॉ मधु थोट्टापिली यांना धोनीसोबत मुंबईला पाठवले आहे. याआधी बुधवारी चेन्नई सुपर किंग्जचे सीईओ काशी विश्वनाथन यांनी धोनीच्या दुखापतीबाबत माहिती दिली होती. मीडिया रिपोर्ट्सनुसार चाहत्यांचा लाडका महेंद्रसिंह धोनी याच्या गुडघ्यावर मुंबईतील कोकिलाबेन हॉस्पिटलमध्ये यशस्वी शस्त्रक्रिया करण्यात आली आहे. मात्र, याबाबत अद्याप कोणतेही अधिकृत वक्तव्य आलेले नाही.
मॅचनंतर सीएसकेचे मुख्य कोच स्टीफन फ्लेमिंग यांनी सांगितले की, टूर्नामेंटच्या पहिल्या मॅचमध्ये धोनीच्या पायाला दुखापत झाली. त्यानंतर तो इतर सामन्यावेळी गुडघ्याला पट्टी बांधून खेळत होता. गुडघ्याला झालेल्या दुखापतीमुळे धोनीला संपूर्ण इनिंगमध्ये फलंदाजी करणे शक्य झाले नाही त्यामुळे यंदा त्याची कामगिरी खालावली. पिचवर तो धावून रन्स घेण्याऐवजी मोठे शॉट्स मारताना दिसला.