पुणे । विधानसभा निवडणुका अवघ्या काही महिन्यांवर येऊन ठेपल्या असून यामुळे आता राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार हे महाराष्ट्र पिंजून काढणार आहेत. मात्र अशातच केंद्र सरकारकडून शरद पवार यांना झेड प्लस सुरक्षा देण्यात येणार आहे. त्यामुळे सुरक्षेसाठी ५५ सशस्त्र सीआरपीएफ जवानांची तुकडी तैनात असेल. मात्र या निर्णयावर शरद पवार यांनी शंका उपस्थित केली आहे.
काय म्हणाले शरद पवार?
झेड प्लस सुरक्षा देण्याच्या निर्णयावर शरद पवार यांनी पहिल्यांदा प्रतिक्रिया दिली. ‘ मला काही माहिती नाही, गृहखात्याचे अधिकारी माझ्याकडे आले आणि त्यांनी सांगितलं की 3 लोकांना झेड प्लस सुरक्षा देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. ती तीन लोकं म्हणजे मी, आरएसएस ( राष्ट्रीय स्वयंसेवक संघ) सरसंघचालक मोहन भागवत आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह.
मला सुरक्षा कशासाठी दिली ते माहीत नाही. पण निवडणुका डोळ्यासमोर आहेत, म्हणून सुरक्षा दिली असावी. माझ्या दौऱ्याची खात्रीलायक माहिती मिळवण्याची व्यवस्था असू शकते ‘ अशी प्रतिक्रिया झेड प्लस सुरक्षा मिळाल्यानंतर शरद पवार यांनी दिली.यासंदर्भात पण गृहमंत्रालयातील जबाबदार व्यक्तीशी संवाद साधणार आहे, त्यांच्याशी बोलून माहिती मिळाली की पुढे काय निर्णय घ्यायचा, काय करायचं ते ठरवणार असंही त्यांनी नमूद केलं.