नवी दिल्ली । अयोध्येतील राम मंदिरात रामलल्लाची प्राणप्रतिष्ठा होणार आहे. या निमित्ताने देशभरात उत्साहाचे वातावरण आहे. याच दरम्यान, मोदी सरकारने आज गुरुवारी एक मोठी घोषणा केली आहे. केंद्रीय राज्यमंत्री जितेंद्र सिंह यांनी दिलेल्या माहितीनुसार, 22 जानेवारीला रामलल्लाच्या अभिषेक दिनी अर्ध्या दिवसासाठी कार्यालये बंद राहतील. जनतेच्या तीव्र भावना लक्षात घेऊन हा निर्णय घेण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.
सरकारने आपल्या आदेशात म्हटले आहे की, ‘अयोध्येतील रामलला प्राण प्रतिष्ठा 22 जानेवारी 2024 रोजी संपूर्ण भारतात साजरी केली जाणार आहे. कर्मचाऱ्यांनाही उत्सवात सहभागी होता यावे यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. 22 जानेवारी 2024 रोजी दुपारी 2:30 वाजेपर्यंत भारतातील सर्व केंद्र सरकारी कार्यालये, केंद्रीय संस्था आणि केंद्रीय औद्योगिक आस्थापने अर्धा दिवस बंद राहणार आहेत.