केंद्र सरकारच्या ‘या’ निर्णयाचे आयएमएने केले स्वागत

जळगाव : रुग्णास जोपर्यंत हेतू पुरस्कर हानी पोहोचवण्याचा प्रयत्न होणार नाही, तोपर्यंत वैद्यकीय अपघात किंवा निष्काळजीपणा या गुन्ह्याच्या व्याख्येत बसत नसेल तर डॉक्टरांवर फौजदारी खटला चालवणे आता शक्य होणार नाही अशी केंद्र सरकारने कायद्यात दुरुस्ती केली आहे. या निर्णयाचे आयएमएचे राज्य उपाध्यक्ष डॉ. विलास भोळे, जळगाव शाखेचे अध्यक्ष डॉ. सुनील नाहाटा, मानद सचिव डॉ. तुषार बेंडाळे यांनी स्वागत केले आहे.

डॉक्टरांचा रुग्णांवर उपचार करताना कोणताही गुन्हेगारी हेतू नसतो अशी आयएमएने कायम भूमिका मांडली आहे. 19 व्या शतकातील ब्रिटिशकालीन कायदा भारतीय न्याय संहितेच्या माध्यमातून सध्याच्या भारत सरकारने बदलवून दुरुस्त केला आहे. डॉक्टर्स पिढ्यानपिढ्या डोक्यावर टांगलेल्या गुन्हेगारीच्या तलवारी विना औषधोपचार करतील असा विश्वास आयएमएने व्यक्त केला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी व गृहमंत्री अमित शाह यांचे आयएमएने मागणी मान्य करून कायदा दुरुस्ती केल्याबद्दल आभार व्यक्त केले आहे.

वैद्यकीय निष्काळजीपणामुळे रुग्णाचा मृत्यू झाल्यास ती हत्या मानून डॉक्टरांना तुरुंगवास होत असे.आता या कायद्यातून मुक्त झाल्यामुळे डॉक्टर गंभीर क्षणी धोका पत्करून रुग्णाचा जीव वाचविण्याचा प्रयत्न करतील.डॉक्टरांकडे गुन्हेगार म्हणून बघण्याची पद्धत बदलून आयएमए आणि देशातील डॉक्टर्स जनतेच्या आरोग्यासाठी लढतील असा विश्वास आयएमए जळगाव शाखेतर्फे पत्रकारांवर व्यक्त करण्यात आला आहे.