केजरीवाल आणि कविता यांच्या विरोधात ईडी उद्या पुरवणी आरोपपत्र दाखल करू शकते !

दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल आणि के कविता यांच्या विरोधात अंमलबजावणी संचालनालय (ED) मद्य घोटाळा प्रकरणात शुक्रवारी पुरवणी आरोपपत्र दाखल करू शकते. सूत्रांच्या हवाल्याने ही माहिती समोर आली आहे.

केंद्रीय एजन्सीने कविता यांना १५ मार्च, तर केजरीवाल यांना २१ मार्चला अटक केली. सध्या ते न्यायालयीन कोठडीत तिहार तुरुंगात आहे. यापूर्वी, त्यांच्या कोठडीची मागणी करताना सुनावणीदरम्यान ईडीने म्हटले होते की, केजरीवाल हेच दारू घोटाळ्यातील मुख्य सूत्रधार आहेत.

तपास यंत्रणेचे म्हणणे आहे की दिल्लीच्या मुख्यमंत्र्यांना नवीन मद्य धोरण 2021-22 तयार करण्यासाठी आणि अंमलात आणण्यासाठी ‘साउथ ग्रुप’ कडून अनेक कोटी रुपयांची लाच घेतली आहे. अतिरिक्त सॉलिसिटर जनरल (एएसजी) एसव्ही राजू यांनी राऊस एव्हेन्यू न्यायालयात सांगितले होते की, त्यांनी निवडणूक लढवण्यासाठी ‘साऊथ ग्रुप’च्या काही आरोपींकडून 100 कोटी रुपयांची मागणी केली होती.

सर्वोच्च न्यायालयात शुक्रवारी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या खटल्याची सुनावणी होणार आहे. न्यायमूर्ती खन्ना यांनी एएसजी राजू यांना सांगितले की, तुम्ही उद्यापासून (जीएसटी बॅचमध्ये) चर्चा सुरू करा. राजू म्हणाले की, केजरीवाल यांच्या याचिकेवर गुरुवारी सुनावणी आहे. न्यायमूर्ती खन्ना म्हणाले नाही, शुक्रवारी आहे. जोपर्यंत अंतरिम आदेश इत्यादींचा संबंध आहे, तो आदेश आम्ही शुक्रवारी पास करू शकतो.

7 मे रोजी न्यायमूर्ती संजीव खन्ना आणि दीपंकर दत्ता यांच्या खंडपीठाने सांगितले की, केजरीवाल यांना केवळ या अटीवरच दिलासा दिला जाईल की ते कोणतेही अधिकृत कर्तव्य बजावणार नाहीत कारण त्याचा “व्यापक परिणाम” होऊ शकतो. लोकसभेच्या निवडणुका पाच वर्षांतून एकदा घेतल्या जात असल्याने परिस्थिती ‘असाधारण’ आहे, असेही सर्वोच्च न्यायालयाने म्हटले आहे. दिल्लीच्या राऊस एव्हेन्यू कोर्टाने केजरीवाल यांची न्यायालयीन कोठडी 20 मे पर्यंत वाढवली आहे.

केजरीवाल यांच्या पत्नीने निवडणूक प्रचाराची धुरा सांभाळली
केजरीवाल यांच्या अनुपस्थितीत त्यांच्या पत्नी सुनीता केजरीवाल लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराची धुरा सांभाळत आहेत. अरविंद केजरीवाल यांचा आवाज दाबण्यासाठी निवडणुकीपूर्वी तुरुंगात टाकण्यात आल्याचा दावा सुनीताने नुकताच केला होता. भाजप आणि केंद्र सरकार हुकूमशाही असल्याचा आरोप त्यांनी केला. त्याच वेळी, त्यांनी 25 मे रोजी राष्ट्रीय राजधानीत मतदानाच्या दिवशी लोकांना “हुकूमशाही” विरोधात मतदान करण्याचे आवाहन केले.