चोपडा : तालुक्यातील खडगाव, गोरगावले, घुमावल परिसरात केबल चोरीच्या घटना वाढल्या असून, शेतकरी त्रस्त झाले आहे. या भागात पोलिसांचा वचक राहिला नाही ? असा सवाल शेतकरी वर्गाकडून होत आहे.
चोपडा तालुक्यातील खडगाव, गोरगावले, घुमावं ल भागातील रस्ते तसेच शेती शिवारातील महत्त्वाचे ठिकाणावर यापूर्वी पोलिसांची गस्त राहत होती. परंतु अलीकडे पोलिसांची गस्त नसल्याने शेतकऱ्यांचे शेती क्षेत्रातील चोऱ्यांचे प्रमाण वाढले आहे. चोपडा शहर पोलीस स्टेशन याकडे अक्षम्य दुर्लक्ष करीत आहे. परिणामी शेतकऱ्यांना दरडोई किमान दहा हजार रुपये नुकसान सोसावे लागत आहे. दरम्यान, १ जून रोजी सुमारे 40 ते 50 शेतातील शेतकऱ्यांच्या केबल वायर काढून चोरट्यांनी पोबारा केला आहे. महिन्याभरात ही दुसरी घटना असून, यामुळे शेतकरी त्रस्त झाले आहे.
खडगावचे शेतकरी मुरलीधर ताराचंद पाटील, घुमावल येथील गोरख धोंडू पाटील, बाळू गोविंदा पाटील. गोरगावले बुद्रुक येथील बाबूलाल सिताराम पाटील, विकास माधवराव पाटील, बाबुराव पाटील आधी 40 ते 50 शेतकऱ्यांनी याबाबत तक्रारी केल्या आहेत. चोपडा शहर व परिसरात या केबल वायर मधील तांब्याच्या तारा काढून ते विक्री करणारी टोळी कार्यरत असल्याचे संगणमतातून हे गुन्हे घडत आहेत असे जाणकार शेतकऱ्यांनी म्हटले आहे.