जळगाव : केळी पिक विम्याची रक्कम तात्कळ शेतकऱ्यांच्या खात्यात जमा व्हावी, या मागणीसाठी शेतकरी संघर्ष समितीच्या वतीने गेल्या पाच दिवसांपासून आमरण उपोषण सुरु आहे. दरम्यान, आज २२ रोजी उपोषणार्थी निंभोरा सिम ते पिंप्रीनांदु दरम्यान असलेल्या तापी पुलावरुन उडी मार आंदोलन करणार असल्याचा इशारा दिला आहे. या परिसराची कायदा व सुव्यवस्था अबाधित रहावी व जनजीवन सुरळीत रहावे, यासाठी फैजपूर उपविभागीय अधिकारी कैलास कडलग यांनी संचारबंदी आदेश जारी केले आहेत.
केळी पिक विम्याची रक्कम तात्कळ शेतकऱ्यांच्या खात्यात जमा व्हावी, या मागणीसाठी शेतकरी संघर्ष समितीच्या वतीने सचिन रमेश पाटील (चोरवड, ता. रावेर) व योगेश ब्रिजलाल पाटील (रा. मुंजलवाडी, ता. रावेर) हे १८ ऑक्टोंबर पासून रावेर तहसील कार्यालया समोर आमरण उपोषणास बसले आहे.
यातील उपोषणार्थी रमेश नागराज पाटील हे रविवार, २२ ऑक्टोंबर रोजी निंभोरा सिम ते पिंप्रीनांदु दरम्यान असलेल्या तापी पुलावरुन उडी मार आंदोलन करणार असल्याचा इशारा दिला आहे. त्यामुळे सुरक्षिततेच्या दृष्टीकोनातून पिंप्रीनांदु ते निंभोरा सिम दरम्यान तापी नदीवरील पुलावर प्रवेश बंदी करण्यात आला आहे.
या परिसराची कायदा व सुव्यवस्था अबाधित रहावी व जनजीवन सुरळीत रहावे, याकरीता फौजदारी प्रक्रिया संहिता १९७३ चे कलम १४४ अन्वये संचारबंदी लागू करण्यात आली आहे. संचारबंदी आदेशातून अत्यावश्यक सेवा तसेच शासकीय दौरे, शासकीय कर्तव्यावर हजर अधिकारी, कर्मचारी, पोलीस, रुग्णसेवा, पाणीपुरवठा, सार्वजनिक वितरण व्यवस्था तसेच सरकारी, खाजगी बँक, पतसंस्था व अंत्यविधी यांना लागू राहणार नाहीत, असे या आदेशात नमूद करण्यात आले आहे.