कोळसा टंचाईचे संकट! राज्यातील सात वीजनिर्मिती केंद्रांकडे चार दिवसांपुरताच कोळसा शिल्लक

जळगाव/मुंबई । नियमांनुसार महानिर्मितीच्या केंद्रांमध्ये १४ दिवस पुरेल इतका कोळशाचा साठा शिल्लक असणे अनिवार्य आहे. मात्र सध्या सरासरी चार दिवस पुरेल इतकाच कोळसा शिल्लक असून यामुळे राज्यावर पुन्हा एकदा भारनियमनाचे संकट आले आहे.

देशातील इतर भागासह राज्यात पाऊस सुरु असून काही ठिकाणी पावसाने अक्षरशः थैमान घातले आहे. यामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. यातच पावसामुळे कोळसा खाणीतून निघणाऱ्या कोळशाचे प्रमाण कमी झाल्याने आता कोळसा टंचाईची झळ बसण्याची शक्यता आहे. महानिर्मितीच्या राज्यभरातील सातही औष्णिक वीजनिर्मिती केंद्रांवर सरासरी चार दिवस पुरेल इतकाच कोळसा शिल्लक आहे.

महानिर्मितीत सरासरी सव्वा लाख टन कोळशाची तूट आहे. तसेच सणासुदीचे दिवस सुरु असून राज्यातील गणेशोत्सव व आगामी काळातील सण उत्सवांमुळे दिवाळीपर्यंत विजेची मागणी कायम राहणार आहे. पूर्ण क्षमतेने अर्थात साडेसात हजार मेगावॅट वीजनिर्मिती करायची असल्यास किमान रोज ६७ हजार ५०० टन कोळशाची गरज भासते. त्यानुसार सध्या जवळपास सव्वालाख टनांची तूट आहे.

राज्यातील महानिर्मितीच्या सातही औष्णिक केंद्रातून कोळशाअभावी वीजनिर्मिती घसरली तर राज्यात पुन्हा काही वितरण ग्रुपवर वीजभारनियमन होण्याची भिती आहे. आगामी काळात सण उत्सवांच्या पार्श्वभूमीवर राज्याची वीज मागणी सरासरी दीड हजार ते १७०० मेगावॅटने वाढू शकते. अशा वेळी निर्मितीही वाढविणे अपेक्षीत आहे. मात्र कोळशाअभावी ती वाढली नाही तर राज्याला पुन्हा आपत्कालीन भारनियमनाचा फटका बसेल.