जामनेर : कौटुंबिक वादातून पतीने केलेल्या बेदम मारहाणीत पत्नीचा मृत्यू झाल्याची घटना गोद्री येथे रविवार, ४ रोजी घडली. या प्रकरणी जामनेर पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला. काजल विशाल चव्हाण (२४ ) असे मयत महिलेचे नाव आहे.
जामनेर तालुक्यातील गोद्री येथे मयत काजल ही पती विशाल, सासू-सासरे यांच्यासह राहत होती. काही महिन्यांपूर्वीच विशाल आणि काजलचा विवाह झालेला आहे. दरम्यान, गेल्या दिवसांपासून दोघांत कौटुंबिक विषयावरून वादविवाद होत होते. अशातच रविवार, ४ रोजी रात्री ९ वाजता सुमारास दोघांचा वाद विकोपाला गेला. पती विशालने संतप्त होऊन काजलच्या तोंडावर, नाकावर, दांड्याने जबर मारहाण केली.
या मारहाणीत काजल ही गंभीर जखमी झाली. तात्काळ ग्रामस्थांनी काजलला जामनेर उपजिल्हा रुग्णालयात नेले असता, वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासून मृत घोषित केले.
घटनेची माहिती मिळताच जामनेर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. पती विशाल याला ताब्यात घेतले असून, विशालविरोधात जामनेर पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला.