खंडपीठाच्या निर्णयाने भुसावळातील खडसे गटात आनंदोत्सव : जाणून घ्या नेमकी बातमी

भुसावळ : भाजपच्या चिन्हावर निवडून आल्यानंतर पालिकेचा कार्यकाळ संपण्यापूर्वी नगराध्यक्षांसह 10 नगरसेवकांना जिल्हाधिकार्‍यांनी अपात्र ठरवले होते तर जिल्हा प्रशासनाच्या निर्णयाविरोधात राज्य शासनाकडे अपील केले करूनही तेथेदेखील निराशाच पदरी पडल्याने अपात्र नगरसेवकांनी उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात याचिका दाखल केली होती. न्या.अरुण आर.पेडणेकर यांनी याचिकेवर सोमवार, 6 मार्च रोजी निकाल देत नगरविकास विभागाचा आदेश रद्द ठरवत संबंधिताना केवळ 2021 पर्यंत (एका टर्मसाठी) अपात्र ठरवले आहे त्यामुळे आगामी काळात या नगरसेवकांना आता पालिका निवडणूक लढण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. माजी मंत्री एकनाथ खडसे गटातील नगरसेवकांना खंडपीठाच्या या निर्णयाने मोठा दिलासा मिळाला आहे तर आगामी पालिका निवडणुकीत यामुळे राजकीय समीकरणे बदलण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

असे होते नेमके अपात्रता प्रकरण
भुसावळात 2016 मध्ये झालेल्या पालिका निवडणुकीत भाजपच्या कमळ चिन्हावर निवडून आलेल्या लोकनियुक्त नगराध्यक्ष व भाजपाचे नऊ नगरसेवक यांनी कार्यकाळ संपण्यापूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता. या प्रकरणी भाजपच्या माजी नगरसेविका पुष्पा बतरा यांनी जिल्हाधिकार्‍यांकडे अपात्रतेची कारवाईबाबत याचिका दाखल केली. या याचिकेवर जिल्हाधिकार्‍यांनी लोकनियुक्त नगराध्यक्ष रमण देविदास भोळे, नगरसेवक अमोल इंगळे, लक्ष्मी मकासरे, सविता मकासरे, प्रमोद नेमाडे, मेघा वाणी, बोधराज चौधरी, शोभा नेमाडे, किरण कोलते, शैलेजा नारखेडे यांना 18 डिसेंबरपासून 2021 पासून पुढील सहा वर्षांसाठी अपात्र ठरविले होते. यानंतर अपिलादरम्यान नगरविकास विभागानेही जिल्हाधिकार्‍यांचा निर्णय कायम ठेवला होता.

खंडपीठात खडसे गटाला दिलासा
या प्रकरणी अपात्र नगरसेवकांनी औरंगाबाद खंडपीठात अपील केले. या अपिलावर सुनावणी झाल्यानंतर सोमवार, 6 रोजी खंडपीठाने केवळ एका टर्मसाठी (पाच वर्ष) नगरसेवकांना अपात्र केल्याने भुसावळातील खडसे गटातील नगरसेवकांना मोठा दिलासा मिळाला आहे. अपात्र नगरसेवकांकडून अ‍ॅड.आर.आर.देशमुख तर भाजपच्या माजी नगरसेविका पुष्पा बतरा यांच्या वतीने अ‍ॅड.होन यांनी काम पाहिले.

खंडपीठाच्या निर्णयाचे स्वागत
खंडपीठाने दिलेल्या निर्णयाचे आम्ही स्वागत करतो. न्यायालयाकडून आम्हाला हा निकाल अपेक्षित होता. या निर्णयामुळे पुढील सर्व निवडणुका लोकप्रतिनिधींना लढवता येणार असल्याने सर्व नगरसेवकांना मोठा दिलासा मिळाला असल्याचे आमदार खडसे गटाचे माजी नगरसेवक प्रा.सुनील नेवे यांनी सांगितले. दरम्यान, न्यायालयाचे आदेश अद्याप मिळालेले नाहीत मात्र पक्षश्रेष्ठींशी चर्चा करून पुढील निर्णय घेवू, असे याचिकाकर्त्या माजी नगरसेविका पुष्पा बतरा यांनी सांगितले.