खजिना

तरुण भारत लाईव्ह न्यूज । डॉ. अलका कुलकर्णी ।  खजिना! आठवतायेत ना त्या लहानपणी वाचलेल्या गोष्टी? खजिना मिळण्याआधी नायकाला किती कठीण प्रसंगांना सामोरे जावे लागत असे. उंच डोंगर आणि घनदाट अरण्ये, समुद्रावरचे चाचे. कधी दुष्ट जादूगार. शेवटी सापडलेला तो खजिना! सुवर्ण मोहरांनी भरलेल्या हंड्या आणि काय काय!

यावर्षी मलासुद्धा खजिना सापडला. खरं वाटत नाही ना? सापडला साता समुद्रापार. ऑस्ट्रेलियातल्या डलेड नावाच्या गावी. ध्यानीमनी नसताना सापडला. एका लहानशा पण सुंदर रस्त्यावर आम्ही दोघे फिरत होतो. दोन्ही बाजूला टुमदार घरं, रसरशीत बागा आणि अनोखे रंग आणि आकार असलेली फुलं. मन कसं प्रसन्न होतं! अचानक मी थबकले. एका बागेच्या कोपर्‍यात खरंच मला खजिन्याची पेटी दिसली.

घरच्या मालकांनी त्यांच्या बागेत उभारलेली. लाकडी पेटी त्याला काचेचे दार. गंमत म्हणजे आत एवढा थोरला खजिना असून पेटीला कुलूप-कडी काही नाही. पेटीखाली फलक होता ‘स्ट्रीट लायब्ररी’ फलक सांगत होता की, ही जी ही पुस्तकं आहेत ती सर्वांसाठी आहेत. पाहिजे तर चाळा. पाहिजे तर वाचायला घरी न्या. वाचून झाल्यानंतर परत आणून ठेवा आणि फारच आवडलं तर स्वतःसाठी ठेवूनच घ्या. तुमच्या घरातील वाचून झालेली पुस्तकंही आणून ठेवा.

पुष्कळ लोकांकडे इतकी पुस्तक जमतात की ती ठेवायला जागा पुरत नाही. मग कोणी ती माळ्यावर ठेवून देतात आणि कोणी ती रद्दीत फेकून देतात. मला तर रद्दी डेपोमध्ये खूप सुंदर सुंदर पुस्तकं सापडलेली आहेत. नोंद घेण्याची बाब म्हणजे ही पुस्तके उत्कृष्टरित्या राखलेली होती. कुठे पाने फाटलेली नाहीत, कोणी ओरबाडलेली नाहीत किंवा वाचता वाचता पानं दुमडून ठेवलेली नाहीत. इथे मला ‘द इयरलिंग’ नावाचं प्रसिद्ध पुस्तक सापडलं. त्यात एक 13-14 वर्षाचा मुलगा आणि त्यांनी बाळगलेलं हरिणाचं पिल्लू यांच्या नात्याची गोष्ट आहे.

आपल्याकडे राम पटवर्धन यांनी या पुस्तकाचं ‘पाडस’ नावाने भाषांतर केलेलं आहे. हे पुस्तक मिळणे म्हणजे खजिनाच मिळणे! मनात विचार आला की, आपल्या देशात हे शक्य होईल का? कोणी पुस्तक फाडेल कोणी ती घरी नेऊन रद्दीत विकेल आणि कोणी तर लाकडीपेटीच घरी घेऊन जाईल. नाही नाही एक दिवस असा येईल की, आपल्या देशातसुद्धा अशा अशी रस्त्यावरची ग्रंथालये निर्माण होतील आणि सुस्थितीत राहतील. मग दिवस सोनियाचा होईल. वाट पाहूया.