एरंडोल : मे महिन्याला सुरुवात झाली असून एरंडोल शहराला पाणीपुरवठा होणाऱ्या अंजनी धरणात अवघा पाच टक्के पाणीसाठा आहे. धरणाच्या जलसाठ्यातून एरंडोल शहरासह कासोदा फरकांडे जळू नानखुर्द बुद्रुक नानखुर्द खुर्द धारागीर विखरण बांभोरी खुर्द टोळी खुर्द इत्यादी गावांना पाणीपुरवठा होत आहे अशा स्थितीत गिरणा पाटबंधारे उपविभागाचे अधिकारी मनमानी करून अंजनी मध्यम प्रकल्पातील पाच टक्के पाणी साठ्यातून सोनवद तालुका धरणगाव पर्यंत अंजनी नदी द्वारे पाणी सोडण्याचे नियोजन करीत आहेत. नदीपात्रात पाणी सोडण्याला एरंडोल येथील माजी नगराध्यक्ष व शहरवासीयांनी प्रखर विरोध केला असून, याबाबत जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिले आहे. जर नदी पात्रात पाणी सोडले तर एरंडोल शहरासह परिसरातील सर्व गावांवर पिण्याचे पाण्याचे भयंकर सावट निर्माण होऊ शकते अशी भीती निवेदनात व्यक्त करण्यात आली आहे.
निवेदनावर शिवसेना उबाठा गटाचे रमेश जगन्नाथ महाजन माजी नगराध्यक्ष राजेंद्र चौधरी माजी नगराध्यक्ष किशोर बाबुराव निंबाळकर माजी नगराध्यक्ष दशरथ बुधा महाजन यांच्या निवेदनावर स्वाक्षऱ्या आहेत. दरम्यान सदर पदाधिकाऱ्यांनी अंजनी धरण स्थळावर जाऊन प्रत्यक्ष पाणी साठ्याची पाहणी केली असता त्या ठिकाणी गिरणा पाटबंधारे विभागाचे कोणीही अधिकारी किंवा कर्मचारी स्थळावर उपस्थित नसल्याबद्दल त्यांनी नाराजी व्यक्त केली.
अंजनी नदी पात्रात प्रचंड प्रमाणात वाळू उपसा झाल्याने नदीपात्रात मोठ मोठे खड्डे पडले आहेत त्यामुळे ठराविक ठिकाणापर्यंत पाणी पोहोचणे शक्य नाही केवळ जवखेडे बुद्रुक ते हिंगोणा बुद्रुक या गावांपर्यंत पाणी पोहोचू शकते अशी नदी पात्राची अवस्था झाली आहे या प्रकारामुळे”उघड्या पाशी नागडं जाणं व सारी रात्र थंडीनं मरण”अशी स्थिती होणार आहे असे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.
अंजनी धरणात पाच टक्के पाणीसाठा शिल्लक असताना अधिकारी वर्गाचा नदीपात्रात पाणी सोडण्याचे नियोजन हे एरंडोल शहरासह आठ ते दहा गावांना तीव्र पाणी टंचाई निर्माण करण्यास कारणीभूत ठरू शकते आधीच एरंडोल येथे आठवड्यातून एकदा पाणीपुरवठा होत आहे त्यात नदी पात्रातून पाणी सोडण्याचा निर्णय झाल्यास सदर सर्व गावांना तीव्र पाणीटंचाईची झळ सोसावी लागणार आहे तरी अंजनी धरणातून नदीपात्रात पाणी न सोडण्याचा कडक आदेश होणे गरजेचे आहे अन्यथा जन माणसांच्या भावना दुखावल्या गेल्या तर तीव्र उद्रेक होऊ शकतो आणि आंदोलनात्मक पवित्रा घेणे भाग पाडेल असा इशारा देण्यात आला आहे.
दरम्यान गिरणा पाटबंधारे उपविभागातर्फे अंजनी नदी पात्रात पाणी सोडता येईल का याबाबत पाहणी सुरू असून याबाबतचा अहवाल वरिष्ठांकडे पाठविण्यात येणार आहे. क्षेत्रीय पाहणी करण्याचे काम कनिष्ठ अभियंता व्यास यांनी केली आहे.याआधी फेब्रुवारी २०२४ महिन्यामध्ये दोन दिवस धरणगाव तालुक्यासाठी अंजनी नदी पात्रातून आवर्तन सोडण्यात आले होते.
अंजनी नदी पात्रात पाणी सोडता येईल का याबाबत पाहणी करून अहवाल अधीक्षक अभियंता लाभक्षेत्र विकास प्राधिकरण यांच्याकडे लवकरच पाठवण्यात येईल. कॅनॉलच्या आऊटलेटच्या खाली पाणी पातळी पोहोचली आहे.
दरम्यान नदीपात्रातून पाणी सोडण्याबाबत कोणताही आदेश आतापर्यंत झालेला नाही.
– सुभाष चव्हाण, उपविभागीय अभियंता गिरणा पाटबंधारे उपविभाग, एरंडोल.