कासोदा : जळगाव जिल्ह्यात अवैध वाळू वाहतूक करणाऱ्या वाळू माफियांची मुजोरी दिवसेंदिवस वाढतच असून त्यांच्याकडून अधिकाऱ्यांवर वाहन घालणे, वाहने पळवून नेण्याचे प्रकार जिल्ह्यात नित्याचेच झाले आहेत. आता एक खळबळजनक प्रकार समोर आला आहे. एरंडोलचे प्रांताधिकारी मनीषकुमार गायकवाड यांना वाळूमाफियांनी गळा आवळून ठार मारण्याचा प्रयत्न केल्याचा उत्राण (ता. एरंडोल) येथील गिरणा नदीपात्रात घडला.
वाळूमाफियांवर महसूल पथक कारवाईसाठी गेले असता हा प्रकार घडला, याबाबत कासोदा (ता. एरंडोल) पोलिसात १० ते १२ जणांविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे.
नेमका प्रकार काय?
एरंडोल तालुक्यातील उत्राण शिवारातील गिरणा नदीच्या पात्रात प्रांताधिकारी मनीषकुमार गायकवाड हे पथकासह शुक्रवारी रात्री अवैध वाळू वाहतुकीवर कारवाईसाठी गेले होते. तिथे त्यांना दहा-बारा ट्रॅक्टर्स आढळून आले.
पथकाला पाहताच यावरील काही चालकांनी परधाडे गावाच्या दिशेने धूम ठोकली. मात्र तिथे असलेल्या चार ते पाच संशयितांनी महसूल पथकाशी हुज्जत घातली आणि ‘ट्रॅक्टर नेल्यास हात-पाय तोडू’, अशी धमकी देत संशयितांनी आपल्या अन्य काही साथीदारांना बोलावून घेतले.
यावेळी वाळूमाफियांनी प्रांताधिकारी मनीषकुमार गायकवाड, भालगाव मंडळाधिकारी दीपक ठोंबरे, उम्राण तलाठी शकील अहमद शेख, तलाठी विश्वंभर बाळकृष्ण शिरसाठ यांच्यावर हल्ला चढवत लाथा- बुक्क्यांनी मारहाण केली.
संशयितांनी प्रांताधिकारी मनीषकुमार गायकवाड यांना खाली पाडून त्यांचा गळा आवळत ठार मारण्याचा प्रयल केला. यावेळी उम्राणचे पोलिस पाटील व इतर दोन जणांनी गायकवाड यांच्या अंगावर आडवे होत त्यांची सुटका केली. याप्रकरणी दहा ते बारा जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दरम्यान, हल्ल्याच्या घटनेनंतर जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी शनिवारी सकाळी प्रांत मनीष गायकवाड यांची त्यांच्या निवासस्थानी भेट घेत विचारपूस केली. हल्लेखोर वाळूमाफियांवर मोक्काची कारवाई करण्याबाबत जिल्हाधिकारी प्रसाद यांनी पोलिस अधीक्षक एम. राजकुमार यांच्याशी चर्चा केल्याची माहिती आहे.