धुळे : नकाणे रोडवरील बालाजी नगरात निकिता कल्याण पाटील या २१ वर्षीय तरुणीच्या खुनाची घटना ताजी असतानाच त्याच परिसरात २३ वर्षीय तरुणाचा मृतदेह आढळून आल्याची घटना गुरुवारी सकाळी उजेडात आली. अनिकेत वाल्मीक बोरसे (वय २७, रा. महालेनगर, साक्री रोड, धुळे) असे मृत तरुणाचे नाव आहे. तरुणीच्या खुनाचा आणि तरुणाच्या आत्महत्येचा काही संबंध आहे का, या अनुषंगाने पोलिसांचा तपास सुरू आहे.
गुरुवारी सकाळी मृतक निकिताच्या घराजवळच निर्जनस्थळी एका तरुणाचा मृतदेह आढळून आल्याची माहिती मिळताच अपर पोलिस अधीक्षक किशोर काळे, उपअधीक्षक सचिन हिरे, देवपूर पोलिस निरीक्षक सतीश घोटेकर आणि पोलिसांचे पथक घटनास्थळी दाखल झाले.
त्यावेळी मृतदेहाजवळ विषाची बाटली आणि कपड्यावर रक्ताचे डाग आढळून आले आहेत. तरुणीची हत्या आणि तरुणाची आत्महत्या या दोन्ही घटना लागोपाठ झाल्याने दोन्हींचा एकमेकाशी काही संबंध आहे किंवा नाही याचा तपास सरू आहे.