गुटखा खाल्ल्याने काळे झालेले दात पत्नीला आवडत नव्हते. ती पतीला गुटखा खाण्यापासून रोखायची. यावरून दोघांमध्ये दररोज घरात भांडणे होत होती. हे प्रकरण इतके वाढले की, गुटखा खाण्यास मज्जाव केल्याने संतापलेल्या पतीने पत्नीला जाळून मारले. ही खळबळजनक घटना जो कोणी ऐकली तो थक्क झाला. पोलिसांनी आरोपी पतीला अटक केली आहे.
सुत्रानुसार, सूर्यकांत तिवारी पत्नी दीप्तीसोबत कोलकात्याच्या बोबाजार येथील जदुनाथ डे रोडवरील सहा मजली घराच्या दुसऱ्या मजल्यावर राहतात. दोघेही उत्तर प्रदेशचे रहिवासी आहेत. 4 महिन्यांपूर्वी त्यांचे लग्न झाले. सूर्यकांतला गुटखा खाण्याचे व्यसन असल्याने दीप्ती त्रस्त होती. यावरून दोघांमध्ये रोज मारामारी होत होती. 17 ऑक्टोबर रोजी परिस्थिती इतकी बिघडली की सूर्यकांतने दीप्तीला पेटवून दिले.
या घटनेने इमारतीत राहणाऱ्या नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. या घटनेची माहिती स्थानिक लोकांनी पोलिसांना दिली. पोलिसांनी दीप्तीला कोलकाता मेडिकल कॉलेजमध्ये नेले. तेथे डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. पोलिसांनी आरोपी सूर्यकांत तिवारी याला अटक केली.
आरोपी सूर्यकांत तिवारी हा गरियाहाट येथील एका हिंदी माध्यमाच्या शाळेत शिक्षक आहे. सूर्यकांत आणि दीप्ती हे दोघेही उत्तर प्रदेशचे रहिवासी असल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे. मात्र दोघांचेही कुटुंब उत्तर प्रदेशातून कोलकाता येथे फार पूर्वी आले होते. 4 महिन्यांपूर्वी त्यांचे लग्न झाले होते.
आरोपी सूर्यकांत तिवारी याची चौकशी सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले. प्राथमिक माहितीनुसार, आरोपीचे म्हणणे आहे की तो घरातील कलहामुळे कंटाळला होता. चौकशीदरम्यान दीप्तीने नुकतेच कार घेण्यासाठी पैसे मागितल्याचेही समोर आले आहे. सूर्यकांतला पैसे गोळा करण्यासाठी वेळ हवा होता. यावरून दोघांमध्ये भांडणही व्हायचे. या घटनेत सूर्यकांतच्या कुटुंबातील कोणाचा हात आहे का, याचा तपास सध्या पोलीस करत आहेत.