धुळे : धुळे तालुक्यातील नगावमधून एक खळबळजनक घटना समोर आलीय. पुण्याहून इंदूरला घरी जाणाऱ्या तरुणीने नगावमध्ये उतरून स्वतःला पेटवून घेतले आणि उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला. रक्षिता पाटीदार असे मृत तरुणीचे नाव आहे. ही तरुणी इंदूर येथील रहिवासी होती. ती पुण्यात एका कंपनीत नोकरीला होती.
धुळे तालुक्यातील नगाव येथे घडलेल्या या घटनेबाबत प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार तरुणी बराच वेळ फोनवर बोलत असल्याची माहिती समोर आली आहे. शिवाय तरुणीने माचिस देखील नागरिकांकडे मागितल्याची माहिती समोर आली आहे, सदर तरुणी ही मध्यप्रदेश येथील इंदोरमधील असल्याचे तिच्या बॅगेत आढळून आलेल्या आधार कार्ड वरून उघडकीस आले आहे.
तरुणीने स्वतःच अंगावर ज्वलनशील पदार्थ ओतून जाळून घेतले असल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे. नगाव स्टॉप जवळील निर्जनस्थळी तरुणी जळत असल्याचे परिसरातील नागरिकांच्या लक्षात आल्यानंतर परिसरातील नागरिकांनी घटनास्थळी धाव घेत नागरिकांनी उपचारासाठी तात्काळ रुग्णालयात दाखल केले होते, दरम्यान, तरुणीचा उपचारादरम्यान दुर्दैवी मृत्यू झाला आहे. या सर्व प्रकाराचा पोलिसांतर्फे तपास सुरू आहे.