खान्देशच्या ‘या’ तालुक्यात सर्वाधिक पाऊस, ८७.८ मि.मी. नोंद, रस्ता खचला; वाहतूक ठप्प

जळगाव : जिल्ह्यासह नंदुरबार वा धुळे जिल्हयात आज ३० रोजी पावसाने हजेरी लावली. नवापूर तालुक्यात सर्वाधिक पाऊस झाला असून, साधारणतः ८७.८ मि.मी. नोंद झाली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे. तर दुसरीकडे अनेक ठिकणी रस्ता खचला, माती रस्ता वाहून गेला तर नवापुरात वाहतूक ठप्प झाल्याचे समोर आले आहे.

पहिलाच मुसळधार पाऊस…
नवापूर येथील रंगावली नदीस पूर आला असून नदीपात्रात असलेल्या मातीच्या भरावामुळे नागरिकांचा जीव टांगणीला लागला आहे. शहरातील रंगावली नदीवर राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या ठेकेदाराने पुलाचे काम सुरू केले आहे. या ठिकाणी संपूर्ण नदीत भराव करून पुलाचे पिलर टाकण्याचे काम सुरू आहे. परंतु पावसाळ्यापूर्वीच हा मातीचा भराव दूर करणे अपेक्षित होते. परंतु संबंधित ठेकेदाराने अर्धवट भराव काढला आहे. आता नदीला मोठा पूर आल्याने नदीतील भराव काढण्याचे शहाणपण उशिरा सुचल्याचे दिसून आले. नदीला पूर आल्यानंतर जेसीबी यंत्राच्या साह्याने भराव काढण्याचे काम भर पावसात केले जात आहे. परंतु पुन्हा दिवस-रात्र पाऊस झाल्यास पुराचे पाणी शहरात शिरण्याचा धोका आहे. याकडे पालिकेचे सीईओ, तहसीलदार यांचेही दुर्लक्ष होत असल्याचा आरोप स्थानिक नागरिकांनी केला आहे.

जिल्हा प्रशासनाने लक्ष देणे गरजेचे 
नवापूर शहरातील देवल फळी भागांमध्ये ठिकठिकाणी पडलेले खड्डे, मातीच्या भरावामुळे चिखल निर्माण झाला आहे. पाण्याचा निचरा होण्यासाठी सोय नसल्याने महामार्गावर पाण्याचे डबके तयार झाले आहे. यामुळे अनेक वाहन चालक वैतागले असून मोटारसायकल घसरून पडल्याचा घटना घडत आहेत. तरी देखील संबंधित विभाग तेथील उपाययोजनेकडे दुर्लक्ष करत आहे. राष्ट्रीय महामार्ग चौपदरीकरणाच्या कामाकडे जिल्हा प्रशासनाने वेळीच लक्ष देणे गरजेचे आहे. अन्यथा पावसाळ्यात पुढे मोठ्या दुर्घटना घडू शकतात, अशी भीती व्यक्त केली जात आहे.

नवापुर तालुक्यात सर्वाधिक पाऊस
जिल्ह्यात सर्वाधिक ८७.८ मि.मी. पाऊस नवापूर तालुक्यात तर सर्वात कमी ४.३ मि.मी. पावसाची नोंद
शहादा तालुक्यात करण्यात आली. नंदुरबार तालुक्यात २३.५ मि.मी., तळोदा तालुका ४.५ मि.मी. नोंद झाली.
क्राणी तालुका १६.६ मि.म. व अक्कलकुवा २१.७ असा एकूण सरासरी २३.९ मि.मी. पावसाची नोंद झाली.

माती रस्ता वाहिला, डोगेगाव जवळ रस्ता खचला; वाहतूक ठप्प
नवापूर तालुक्यातील प्रतापपूर गावाजवळ सार्वजनिक बांधकाम विभागाकडून पुलाचे बांधकाम सुरू आहे. संथगतीने होणाऱ्या या पुलाच्या कामाने नागरिक वैतागले आहेत. पावसाळ्यापूर्वीच या पुलाचे काम होणे अपेक्षित होते. परंतु विलंबामुळे पावसाळ्यातच नवीन पुलांच्या कामाचा बोजवारा उडाला. पुलाच्या शेजारी वाहतुकीसाठी पर्यायी मातीचा कच्चा रस्ता तयार केला होता. तालुक्यात रात्रभर जोरदार पाऊस झाल्याने हा पर्यायी रस्ता वाहून गेल्याने नवापूर-पिंपळनेर रस्त्यावरील वाहतूक ठप्प झाली. तालुक्यातील कोठडा शिवारात भुत बंगली जवळील पूल, प्रतापपूर पूल व तालुक्यातील रस्त्यांचे काम निकृष्ट दर्जाचे होत असल्याचा आरोप स्थानिकांनी केला आहे. पहिल्याच पावसात शासनाचा पैसा पाण्यात जातो की काय, अशी भीती व्यक्त करण्यात येत आहे. दुसरीकडे तालुक्यातील डोगेगाव जवळ रात्रभर झालेल्या पावसामुळे रस्ता खचल्याने नवापूर-खांडबारा पाचंबा मार्गावरील वाहतूक डोगेगावपर्यंतच सुरू ठेवली आहे. पुढील मार्ग बंद केला आहे.

अंदाजपत्रकानुसार पुलाचे व रस्त्याचे काम सुरू…

नवापूर तालुक्यातील रस्ते, पूल व इमारतीचे बांधकाम हे अंदाजपत्रकानुसार सुरू आहे. कुठेही भ्रष्टाचार होत नसून चांगल्या पद्धतीने कामकरण्याकडे बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांचे लक्ष आहे. संबंधित कामाच्या ठिकाणी बांधकाम विभागाचे अधिकारी पाहणी करत आहे दर्जेदार काम करून घेण्याकडे आमचे लक्ष आहे.

संजय पाडवी, मुख्य अभियंता, सार्वजनिक बांधकाम विभाग, नवापूर