धुळे : सीआरपीएफमध्ये कार्यरत असलेल्या धुळे शहरातील एका जवानानं जम्मू कश्मीर मधील पुलवामा येथे कर्तव्यावर स्वतःगोळी झाडून आत्महत्या केली. योगेश बिरहाडे असे त्यांचे नाव आहे. आत्महत्या करण्यापूर्वी त्यांनी पत्नी आणि मुलांसोबत व्हिडिओ कॉलवरुन संवाद साधला होता. या घटनेमुळे एकच खळबळ उडाली असून अधिकार्यांच्या त्रासामुळेच त्यांनी हे टोकाचे पाऊल उचलल्याचा संशय कुटूंबीयांनी व्यक्त केला आहे. त्यांच्या पश्चात आई-वडील, पत्नी, पाच वर्षाचा मुलगा, एक वर्षाची मुलगी भाऊ असा परिवार आहे.
धुळे शहरातील देवपूर भागातील आनंद नगर, भोई सोसायटीत राहणारे सीआरपीएफचे जवान योगेश बिरहाडे काही दिवसांपूर्वी सुट्टी संपवून सेवेत पुन्हा रुजू झाले होते. ड्युटी जॉईन केल्यानंतर त्यांनी सकाळी साडेअकरा वाजता घरी व्हिडीओ कॉल केला होता. तेव्हा ते पत्नी रामेश्वरी यांच्यासह मुलगा व एक वर्षाच्या मुलीसोबत बोलले. त्यानंतर दुपारी एक वाजता योगेश बिरहाडे यांनी ऑन ड्युटी स्वतः गोळी झाडून आत्महत्या केली. या घटनेमुळं बिरहाडे कुटुंबीयांना मोठा धक्का बसला आहे.
योगेश बिरहाडे रजा संपल्यानंतर ४ मे रोजी ड्युटीवर हजर होण्यासाठी निघाले होते. मात्र, जाताना त्यांची गाडी हुकली. त्यामुळे त्यांना जायला उशीर झाला. या कारणावरून त्यांना अधिकार्यांनी टॉर्चर केले असावे, असा संशय कुटुंबीयांनी व्यक्त केला आहे. दरम्यान, त्यांच्या आत्महत्येचे नेमके कारण अद्याप समजले नसून, याप्रकरणाची सखोल चौकशी करून त्यांच्या आत्महत्येस जबाबदार व्यक्तीवर कारवाई करावी, अशी नातेवाईकांची मागणी आहे.