खान्देशात ऊन, पावसाच्या खेळात कानबाई मातेला भावपूर्ण निरोप

नंदुरबार : श्रावण महिन्यात रिमझिम पाऊस येत असतो. नंदुरबार येथे ऊन, पावसाचा खेळ सुरू होता. सोमवारी सकाळपासून रिमझिम पावसाला सुरूवात झाली आणि काही वेळात ऊन पडतं होते. अशा खेळात खान्देशची कुलदैवत कानुबाई मातेला निरोप देण्यासाठी कुटुंबातील सर्वच सदस्य एकत्र येऊन डिजे व बॅन्डच्या तालावर भक्ती गीत म्हणत नाचत नृत्य करत सोमवारी सकाळी पाताळगंगा नदीवर भक्ती भावाने निरोप दिला.

खान्देशचे कुलदैवत असलेल्या श्री कानुमातेची रविवारी सायंकाळी विधीवत स्थापना करण्यात आली होती. श्रावण सोमवारी कानुमातेची विसर्जन मिरवणूक काढण्यात आली . कानुमातेच्या उत्सवाला शनिवारी सप्त्या पुजनाने सुरुवात झाली. यावर्षी नागपंचमी होवून एकाच वेळी कानुमातेचा उत्सव साजरा केला. कानुमातेची स्थापना व रोट पूजनाचा कार्यक्रम केला जातो. या उत्सवाने कुटुंबामध्ये नवचैतन्याचे वातावरण निर्माण होते. सोमवारी सकाळी नंदुरबार शहरातील पाताळगंगा नदीवर जाऊन निरोप दिला जातो.

हा उत्सव दरवर्षी श्रावण महिन्यात पहिल्या किंवा दुसऱ्या रविवारी व श्रावण सोमवारी कानुमातेचा उत्सव खान्देशातील नंदुरबारसह धुळे व जळगांव जिल्ह्यांमध्ये मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येतो. काही भाविक नागपंचमी पूर्वी तर काही नंतर कानुमातेचा उत्सव साजरा करतात. यावर्षी श्रावण महिन्याला सोमवारपासुन सुरुवात झाल्याने श्रावण महिन्यातील पहिला रविवार व दुसरा श्रावण सोमवार आल्याने कानुमातेचा उत्सव एकाचवेळी सर्वत्र साजरा करण्यात येत आहे. यावर्षी नागपंचमीनंतर एकाचवेळी कानुमातेचा उत्सव साजरा करण्यात येत आहे. खान्देशची कुलदैवत कानुबाई मातेच्या उत्सवानिमित्त कुटुंबातील भाऊबंदकी एकत्र येतात अनेक ठिकाणी कानबाई मातेची स्थापना तर काही ठिकाणी रोट पुजन कार्यक्रम होत असतात. या उत्सवानिमित्त नोकरी, रोजगार व कामानिमित्त गाव सोडून बाहेरगावी गेलेले कुटुंबातील सर्वच सदस्य एकत्र येतात‌. कानुमातेचा उत्सवाने कुटुंबाचा गोतावळा एकत्र येऊन देवीची उत्सव साजरा करतात.