जळगाव : खान्देशात रविवारी झालेल्या जोरदार पावसाने सर्वांना अवकाळीच्या ‘कळा’ सोसाव्या लागल्या आहे. वादळासह विजांच्या कडकडाटात पावसाने हजेरी लावली. शहादा तालुक्यातील जावदातर्फे बोरद येथे वीज पडून तरुणी ठार झाली तर, साक्री तालुक्यातील जेबापूर येथे वादळी वाऱ्यामुळे जि.प. शाळेचे पत्रे उडून गेले. जळगावातही कापूस व कांदा पिकाचे नुकसान झाले आहे.
नंदुरबारात रविवारी दिवसभर पावसाची रिपरिप सुरू असताना दुपारी शहादा तालुक्यातील जावदातर्फे बोरद येथे शेतात काम करीत असलेल्या युवतीच्या अंगावर वीज पडून तिचा मृत्यू झाला, सपना राजेंद्र ठाकरे (वय १८) असे मयत युवतीचे नाव आहे.
नंदुरबार जिल्ह्यात पहाटेपासूनच ढगाळ वातावरण होते. दुपारी पावसाला सुरुवात झाली. जावदातर्फे परिसरात वीज पडली. शेतात काम करणारी सपना ठाकरे या युवतीच्या अंगावर वीज पडल्याने तिचा जागीच मृत्यू झाला.
याबाबत शहादा पोलिसांत आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. तहसीलदार दीपक गिरासे यांनी जावदा येथे घटनास्थळी भेट दिली. पालकमंत्री अनिल पाटील यांनी तहसीलदारांशी संपर्क साधून घटनेची माहिती घेतली.