जळगाव : तालुक्यातील आसोदा गाव गोळीबाराने हादरले आहे. खुनातील संशयित चिंग्याने पूर्व वैमनस्यातून आसोद्यातील तरुणावर मध्यरात्रीच्या सुमारास तीन गोळ्या झाडल्याची बाब समोर आली असून सुदैवाने फायर मिस केल्याने तरुण बचावला आहे. चिंग्या उर्फ चेतन सुरेश आळंदे (30, गणेशवाडी, पांडे चौक, जळगाव) व केयूर कैलास पंदारे (30, शिवाजी नगर, जळगाव) अशी अटकेतील संशयितांची नावे आहेत तर योगेश दिगंबर कोल्हे (31, आसोदा) असे गोळीबारातून बचावलेल्या तरुणाचे नाव आहे.
जामिनावर येताच गोळीबार
चिंग्या हा पोलिस दप्तरी कुविख्यात असून अलीकडेच खुनाच्या गुन्ह्यात जामिनावर मुक्तता झाल्यानंतर दिड महिन्यांपूर्वी त्याचा योगेश कोल्हे सोबत वाद झाल्यानंतर त्याचा वचपा काढण्यासाठी त्याने शुक्रवारी मध्यरात्री सहकारी कैलाससोबत दुचाकीवरून येवून गोळीबार केल्याची माहिती आहे. या घटनेत तीन गोळ्या झाडण्यात आल्या मात्र सुदैवाने या घटनेत योगेश बचावला. दरम्यान, योगेशवरदेखील गुन्हे दाखल असल्याने त्याच्यावर हद्दपारीची कारवाई करण्यात आली मात्र विभागीय आयुक्तांकडून या कारवाईला स्थगिती मिळाल्याची माहिती आहे.