भुसावळ । सणासुदीच्या पार्श्वभूमीवर रेल्वेमध्ये होणारी गर्दी लक्षात घेता रेल्वेकडून अनेक विशेष गाड्या चालविल्या जात आहे. अशातच आता भुसावळ विभागातून अमरावती पुणे आणि बडनेरा नाशिक दरम्यान, उत्सव विशेष मेमू रेल्वे चालविण्याचा निर्णय रेल्वे प्रशासनाने घेतला आहे. यामुळेया विशेष रेल्वेगाड्यांमुळे सणांच्या काळात प्रवाशांना फायदा होणार आहे.
पुणे- अमरावती-पुणे मेमू :
अमरावती – पुणे मेमूच्या एकूण आठ फेऱ्या होणार आहेत. अमरावती येथून ही मेमू पाच ते १८ नोव्हेंबर दरम्यान दर रविवारी आणि बुधवारी दुपारी १२ वाजून ४० मिनिटांनी सुटेल. पुणे येथे दुसऱ्या दिवशी दोन वाजून ४५ मिनिटांनी सुटेल. पुणे येथून ही मेमू सहा ते २० नोव्हेंबर दरम्यान दर गुरुवार आणि सोमवारी सकाळी सहा वाजून ३५ मिनिटांनी सुटेल. ती अमरावती येथे त्याच दिवशी रात्री सात वाजून ५० मिनिटांनी दाखल होईल. या गाडीला अमरावती, बडनेरा, अकोला, मलकापूर, भुसावळ, जळगाव, मनमाड, कोपरगाव, अहमदनगर, दौंड कॉर्ड लाईन, उरुळी, हडपसर आणि पुणे असे थांबे असणार आहे. बडनेरा – नाशिक मेमूच्या एकूण २८ फेऱ्या सहा ते १९ नोव्हेंबर दरम्यान होणार आहेत.
बडनेरा- नाशिक मेमू
विशेष उत्सव मेमू रेल्वे बडनेरा स्थानकावरुन ११ वाजून पाच मिनिटांनी सुटेल आणि नाशिकला त्याच दिवशी ७ वाजून ४० मिनिटांनी पोहचेल. ही विशेष रेल्वेसेवा सहा ते १९ नोव्हेंबर दरम्यान चालवली जाणार आहे. नाशिकवरुन सुटणारी मेमू रात्री ९ वाजून १५ मिनिटांनी सुटेल आणि दुसऱ्या दिवशी पहाटे ४ वाजून ३५ मिनिटांनी बडनेरा स्थानकावर पोहचेल. या दोन्ही मेमू गाड्यांचा प्रवासाचा कालावधी सारखाच असणार आहे. या गाडीला बडनेरा, मुर्तजापूर, अकोला, शेगाव, नांदुरा, मलकापूर, भुसावळ, जळगाव, पाचोरा, चाळीसगावं, नांदगाव, मनमाड, लासलगाव, निफाड आणि नाशिक असे थांबे असणार आहेत.