जळगाव : शिक्षणासाठी एसटीने प्रवास करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. विद्यार्थ्यांना आता एसटीचे पास थेट त्यांच्या शाळेत देण्याच्या सूचना एसटी महामंडळाच्या संचालकांनी स्थानिक एसटी प्रशासनाला दिल्या आहेत. एसटी महामंडळाचे जळगाव विभागप्रमुख भगवान जगनोर यांनी याची अंमलबजावणी १८ जूनपासून केली जाणार असून, शाळा- महाविद्यालयांनी पुरवलेल्या यादीनुसार एसटीच्या कर्मचाऱ्याकडून त्या विद्यार्थ्यांना आणि विद्यार्थिनींना त्यांचे एसटी पास थेट शाळेत देण्यात येणार असल्याची माहिती दिली आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे. शिवाय रांगेत उभे राहून पास घेण्याची वेळ त्यांच्यावर येणार नाही.
नवीन वर्षाच्या पहिल्या सत्रातील शाळा आता सुरू झालेल्या आहेत. घरापासून शाळेपर्यंत जाण्यासाठी शासनाने विद्यार्थ्यांना एसटीच्या माध्यमातून ६६ टक्के सवलत दिली असून केवळ ३३ टक्के रक्कम भरून विद्यार्थ्यांना मासिक पास काढता येईल. त्याचप्रमाणे शासनाच्या पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर योजनेअंतर्गत बारावीपर्यंत शिक्षण घेणाऱ्या सर्व विद्यार्थिनींना मोफत एसटी पासचे वितरण केले जाते. यासाठी विद्यार्थी विद्यार्थिनींना एसटीच्या पास केंद्रावर जाऊन रांगेत उभा राहून पास घ्यावे लागत होते किंवा गटागटाने आगारात जाऊन आगार व्यवस्थापन कडून पास घेतले जात होते. पण, यंदापासून विद्यार्थ्यांना पाससाठी आता रांगेत ताटकळत उभे राहावे लागणार नाही.
मुख्याध्यापक, प्राचार्यांसाठी सूचना
सर्व शाळा महाविद्यालयाच्या मुख्याध्यापक व प्राचार्यांना एसटीच्या आगार व्यवस्थापकांनी पत्र देऊन आपल्या शाळेत नवीन वर्षात शिकणाऱ्या विद्यार्थी विद्यार्थ्यांची यादी तयार ठेवण्यास सांगितले आहे. या अभिनव योजनेचा लाभ राज्यभरात शिक्षण घेणाऱ्या लाखो विद्यार्थी- विद्यार्थिनींना होणार आहे, असा विश्वास महामंडळाला आहे.