नवी दिल्ली : स्मार्टफोन, टीव्ही, फ्रीज किंवा वॉशिंग मशीन यासारख्या अनेक इलेक्ट्रॉनिक वस्तू आजपासून स्वस्त झाल्या आहेत. दरम्यान, सरकारनं इलेक्ट्रॉनिक्स वस्तूंच्या खरेदीवरील जीएसटी कमी केला आहे. आता या वस्तू खरेदी करण्यासाठी ग्राहकांना ३१.१ टक्के जीएसटी भरावा लागणार नाही. सरकारनं या सर्व उत्पादनांवरील जीएसटी जवळपास निम्म्यावर आणला आहे. यामुळे या सर्व वस्तू स्वस्तात ग्राहकांना उपलब्ध होणार आहेत.
वॉशिंग मशिन, मोबाईल फोन, रेफ्रिजरेटर, होम अप्लायन्सेस, यूपीएस आणि इतर इलेक्ट्रॉनिक्स वस्तूंवर आतापर्यंत ३१.३ टक्क्यांपर्यंत जीएसटी आकारला जात होता. पण आता तो १२ ते १८ टक्क्यांपर्यंत आकारला जाईल. अर्थ मंत्रालयानं ट्विटरद्वारे घरगुती उपकरणे आणि इलेक्ट्रॉनिक उत्पादनांवर जीएसटी सूट दिल्याची माहिती शेअर केली आहे. यामुळे आता या वस्तू स्वस्त होणार आहेत.
सरकारनं २७ इंच किंवा त्याहून कमी इंचाच्या स्क्रीनसाठी टीव्हीवरील जीएसटी ३१.३ टक्क्यांवरून १८ टक्के कमी केला आहे. यापूर्वी मोबाईल फोन खरेदी करताना ग्राहकाला ३१.३ टक्के जीएसटी भरावा लागत होता. ती आता १२ टक्क्यांवर आणण्यात आलाय. ज्यामुळे मोबाईल फोन कंपन्यांना त्यांच्या फोनच्या किमतीत कपात करता येणार आहे.
रेफ्रिजरेटर आणि वॉशिंग मशिन तसेच पंखे, कुलर, गिझर इत्यादी गृहोपयोगी वस्तूही स्वस्त होतील. या गृहोपयोगी वस्तूंवरील जीएसटी ३१.३ टक्क्यांवरून १८ टक्क्यांपर्यंत कमी करण्यात आला आहे. मिक्सर, ज्युसर, व्हॅक्यूम क्लीनर, एलईडी, व्हॅक्यूम फ्लास्क आणि व्हॅक्यूम भांडी यांसारख्या इतर घरगुती उपकरणांवरही जीएसटी कमी करण्यात आला आहे. मिक्सर, ज्युसर इत्यादींवरील जीएसटी ३१.३ टक्क्यांवरून १८ टक्क्यांवर आला आहे. तर एलईडीवरील जीएसटी १५ टक्क्यांवरून १२ टक्क्यांवर आला आहे.