पाचोरा : खेडगाव (नंदिचे) येथील हातमजुरी करणाऱ्या एका इसमाने राहत्या घरात गळफास लावून आत्महत्या केली. ही घटना ४ रोजी रात्रीच्या सुमारास घडली. या घटनेप्रकरणी पाचोरा पोलिस स्टेशनमध्ये अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. प्रकाश पाटील (४३) असे आत्महत्या केलेल्याचे नाव आहे.
पाचोरा तालुक्यातील खेडगाव (नंदिचे) येथील प्रकाश पाटील (४३) हे हातमजुरी करुन आपला व आपल्या परिवाराचा उदरनिर्वाह चालवित होते. ४ एप्रिल रोजी रात्रीच्या सुमारास प्रकाश पाटील यांनी राहत्या घरात गळफास लावून आपली जीवनयात्रा संपविल्याची घटना समोर आली. हा प्रकार कुटुंबियांच्या लक्षात येताच त्यांनी एकच आक्रोश केला. प्रकाश पाटील यांना तात्काळ पाचोरा ग्रामीण रुग्णालयात दाखल केले असता वैद्यकीय अधिकारी यांनी प्रकाश पाटील यांना मृत घोषित केले. मयत प्रकाश पाटील यांचे पश्चात् आई, वडील, पत्नी, एक मुलगा, एक विवाहित मुलगी असा परिवार आहे.
प्रकाश पाटील यांच्या अकस्मात मृत्यूने खेडगाव (नंदिचे) गावासह परिसरात शोककळा पसरली आहे. घटनेप्रकरणी पाचोरा पोलिस स्टेशनमध्ये अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून या घटनेचा पुढील तपास पोलिस निरीक्षक अशोक पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस काॅन्स्टेबल विकास खैरे हे करीत आहे.
दरम्यान, प्रकाश पाटील यांचेवर ४ ते ५ लाख रुपये कर्ज झाले असल्याची गावात चर्चा होती. डोक्यावर कर्जाचा डोंगर असल्यानेच प्रकाश पाटील यांनी आत्महत्या केली असावी अशी देखील गावात चर्चा होती.