नंदुरबार : देशातील एस्सी, एसटी आणि ओबीसी यांचे आरक्षण संपवण्यासाठी कॉंग्रेस महाआघाडी महाभक्षणाचे अभियान चालवत आहे परंतु मोदी जिवंत आहे तोपर्यंत हे घडू देणार नाही. कारण मोदी वंचितांच्या आरक्षणाच्या महारक्षणाचा महायज्ञ चालवत असून वंचितांच्या अधिकारांचा मोदी चौकीदार आहे; या शब्दात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज दिनांक 10 मे 2024 रोजी नंदुरबार येथे पार पडलेल्या जाहीर सभेत काँग्रेस पक्ष खोटं बोलण्याची फॅक्टरी उघडून बसलेत. आरक्षणाच्या अनुषंगाने तर त्यांची चोर मचाए शोर अशी स्थिती बनली आहे.
या सभेप्रसंगी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, महाराष्ट्राचे आदिवासी विकास मंत्री नामदार डॉक्टर विजयकुमार गावित, जिल्हा पालकमंत्री तथा राज्याचे पुनर्वसन विकास मंत्री अनिल पाटील, नंदुरबार जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा डॉक्टर सुप्रिया गावित, भाजपाचे महामंत्री विजय चौधरी, माजी मंत्री अमरीश भाई पटेल, आमदार मंजुळा ताई गावित, आमदार काशीराम पावरा, आमदार राजेश पाडवी, आमदार आमशा पाडवी, माजी आमदार चंद्रकांत रघुवंशी, भाजपाचे नंदुरबार लोकसभा प्रभारी तुषार रंधे, भाजपाचे नंदुरबार जिल्हाध्यक्ष निलेश माळी, जिल्हाध्यक्ष बबनराव चौधरी, अजितदादा गटाच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष डॉक्टर अभिजीत मोरे, आर पी आय चे जिल्हाध्यक्ष कुवर, ज्येष्ठ नेते कांतीलाल टाटिया यांच्यासह महायुती च्या घटक पक्षातील प्रदेश समिती व जिल्हा समित्यांवरील पदाधिकारी व्यासपीठावर उपस्थित होते.
नंदुरबार लोकसभा मतदारसंघाच्या महायुतीच्या उमेदवार डॉ. हिना विजयकुमार गावित यांच्या प्रचारासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आवर्जून नंदुरबार येथे जाहीर सभा घेतली. त्या सभेत ते बोलत होते. याच्यापूर्वी 2014 आणि 2019 यावर्षी झालेल्या लोकसभा निवडणुकांमध्ये भाजपाच्या उमेदवार डॉ. हिना गावित यांच्यासाठी मोदी हे प्रचाराला आले होते त्यानंतर यंदाच्या निवडणुकीतही ते आज डॉ. हिना गावित यांच्यासाठी नंदुरबार येथे आले. दरम्यान सभेच्या ठिकाणी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे व्यासपीठावर आगमन झाल्यानंतर महाराष्ट्राचे आदिवासी विकास मंत्री डॉ. विजयकुमार गावित यांनी आणि उमेदवार डॉ. हिना गावित यांनी बिरसा मुंडा व एकलव्य यांची प्रतिमा भेट देऊन त्यांचे स्वागत आणि सत्कार केले तर महामंत्री विजय चौधरी यांनी पगडी देऊन स्वागत केले.
हिना गावित यांच्या बद्दल पंतप्रधानांचे गौरवोद्गार
अक्षय तृतीयेचा दिवस असूनही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे भाषण ऐकण्यासाठी प्रचंड संख्येने नागरिक उपस्थित होते. अक्षय तृतीयेचे औचित्य साधून मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अहिराणी भाषेतून शुभेच्छा देत भाषणाचा प्रारंभ केला. तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आदिवासींचे कुलदैवत देव मोगरा मातेला नमन करून आणि जननायकांचे स्मरण करून अभिवादन केले त्याचबरोबर आखाजी म्हणजे अक्षय तृतीयेच्या व परशुराम जयंती च्या देखील शुभेच्छा दिल्या. अक्षय तृतीयेच्या दिवशी केलेले कार्य अक्षय ठरते आणि आज एवढे मोठे जनता आशीर्वाद द्यायला जमली याचा अर्थ डॉ. हिना गावित यांच्यासह आम्हा सर्वांना जनतेचा अक्षय आशीर्वाद लाभला.
पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की, महायुतीच्या उमेदवार डॉ. हिना गावित यांचा विशेष उल्लेख करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले, हि माझी छोटी मुली आम्हाला खूप मदत करते. संसदेत विरोधकांचे चांगलेच छक्के सोडवते. गरिबांच्या सुखदुःखाची ती खरी साथीदार आहे. आधी मतदान मग जलपान हे लक्षात घेऊन नंदुरबार मतदार संघातील सर्व मतदारांनी जास्तीत जास्त संख्येने मत द्यावे, असेही जाहीर आवाहन केले. विशेष असे की सभा संपल्यावर व्यासपीठावरून उतरताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना उमेदवार डॉ. हिना गावित यांनी वाकुन नमस्कार केला. त्या प्रसंगी त्यांच्या डोक्यावर हात ठेवून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आशीर्वाद दिला.
मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्री यांनीही दिली हॅट्रिकची गॅरंटी
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज दिसणारी लहर उद्या तुफान बनवून येईल आणि काँग्रेस आघाडीला साफ करून जाईल असे सांगत महायुतीचे उमेदवार डॉ. हिना गावित यांचे हॅट्रिक होणार असा विश्वास व्यक्त केला. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील डॉ. हिना गावित हॅट्रिक करतील असा विश्वास व्यक्त केला आणि सांगितले की महाराष्ट्रातील नंदुरबार हा शेवटचा नवे पहिला जिल्हा आहे असे स्वतः नरेंद्रजी मोदी मानतात आणि त्या दृष्टिकोनातूनच त्यांनी आकांक्षित जिल्ह्याचा दर्जा देत विविध विकास योजना येथे दिल्या मोठा निधी दिला. तापी बुराई योजनेला 800 कोटी रुपयांचा निधी दिला त्याप्रमाणे पुढे नर्मदा तापी वळण बंधाऱ्याचे काम देखील पूर्ण करून दाखवू. मंत्री डॉक्टर विजयकुमार गावित आणि डॉक्टर हिना गावित यांनी दहा वर्षात केलेले विकास कार्य जनतेसमोर आहे जनता नक्कीच विकासाला साथ देईल असे फडणवीस म्हणाले.
काँग्रेस आणि उध्दव सेनेवर प्रहार
आपल्या खास शैलीत विरोधकांचा समाचार घेताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उद्धव ठाकरे सेनेचा नकली शिवसेना असा उल्लेख केला तर राहुल गांधी यांचा शहजादा असा उल्लेख केला. भाषणात म्हणाले, प्रभू श्रीरामांच्या मंदिरात जाणे काँग्रेसला तत्वाच्या आणि संकेतांच्या विरुद्ध वाटते. यावरून अल्पसंख्यांकांचे तुष्टीकरण करण्याची त्यांनी गाठलेली पातळी लक्षात येते त्याचबरोबर हिंदू संस्कृतीचे हनन करण्याचे षडयंत्र देखील लक्षात येते. सॅम पित्रोदा यांनी भारतीय दक्षिणात्य लोक आफ्रिकन दिसतात असे वक्तव्य केले होते त्याचा समाचार घेताना पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की, भारतातले काळे लोक कृष्णाच्या रंगाचे आहेत. शहजाद्याच्या या गुरूला द्रोपदी मुरमु यांना राष्ट्रपतीपदावर बसवल्याचे सुद्धा मान्य नव्हते यावरून काँग्रेसी लोकांची आदिवासी विरोधी मानसिकता लक्षात घ्यावी. आदिवासी दलित आणि वंचितांची सेवा करणे मी परिवाराची सेवा मानतो कारण काँग्रेस वाल्यांप्रमाणे मी कुठल्या मोठ्या घराण्यात जन्मलो नाही. गरिबांना घरे दिली घरे म्हणजे नुसत्या भिंती नव्हे गॅस पाणी वीज सगळे दिले. आणखी तीन कोटी लोकांना आम्ही घरे देणार आहोत. आपल्या आजूबाजूला घर गॅस वगैरे पासून वंचित कोणी दिसल्यास त्याला लाभ मिळवून देण्यासाठी घेऊन या त्यांना भेटून मोदीची गॅरंटी द्या. नंदुरबार जिल्ह्यातील बारा लाख हून अधिक जणांना मोफत धान्य देत आहोत. आदिवासींसाठी अत्यंत धोकादायक असलेला सिकलसेल ऍनिमिया संपवण्याचे प्रयत्न मागील साठ वर्षात त्यांनी कधी केले नाही परंतु आम्ही ते अभियान हाती घेतले केवळ निवडणूक म्हणून नव्हे तर आदिवासींच्या भावी पिढीच्या रक्षणासाठी सुरू केले. एकीकडे आमचा हा विकास करण्याचा प्रयत्न आहे परंतु दुसरीकडे काँग्रेस आणि महाआघाडी यांच्याकडे साधा विकास हा शब्द सुद्धा नाही विकास कार्याच्या स्पर्धेत राहणे दूरच. खोटं बोलण्याची फॅक्टरी उघडून बसलेत. आरक्षणाच्या अनुषंगाने तर त्यांची चोर मचाए शोर अशी स्थिती बनली आहे.
काँग्रेसच्या कर्नाटकी फॉर्मुल्याचा धोका
पंतप्रधान नरेंद्र मोदी पुढे म्हणाले की, आरक्षणावर खोटं बोलता बोलता बाबासाहेब आंबेडकर यांना देखील जे मंजूर नव्हते ते धर्मावर आधारित आरक्षण देण्याचे षडयंत्र हाती घेतले आहे. एस सी, एस टी आणि ओबीसी लोकांचे आरक्षण मुस्लिम अल्पसंख्याकांना देण्याचा कर्नाटकातला फॉर्मुला काँग्रेस आघाडी देशभर राबवू इच्छिते. एस सी एस टी आणि ओबीसींच्या हक्काचा आरक्षणाचा तुकडा मुस्लिमांना देणार नाही याची लेखी हमी द्या असे काँग्रेसवाल्यांना सांगितल्यानंतर त्यांनी मूक धोरण स्वीकारले याच्यातूनच दाल मे कुछ काला असल्याचे निष्पन्न होते असे मोदी म्हणाले. परंतु त्यांना कितीही प्रयत्न करू द्या मोदी जिवंत आहे तोपर्यंत देशातील सर्व वंचितांच्या मदतीला मोदीचा भरवसा आहे. धर्माच्या आधारावर कणभर सुद्धा आरक्षण जाऊ देणार नाही, वंचितांचा अधिकार राखणारा मी चौकीदार आहे, या शब्दात मोदी यांनी ग्वाही दिली. उद्धव ठाकरे सेनेचा नकली शिवसेना असा उल्लेख करून ते म्हणाले केवळ अल्पसंख्याकांच्या वोट बँकेसाठी मला शिवीगाळ करतात, गाडण्याची भाषा करतात. परंतु मातृशक्ती पाठीशी असल्यामुळे ते कधी गाडू शकणार नाही. शरद पवार यांचे नाव न घेता मोदी म्हणाले ते इतके हताश झालेत की या निवडणुका संपल्यावर राजकीय जीवनात अस्तित्व टिकवण्यासाठी प्रादेशिक पक्षांनी काँग्रेसमध्ये विलीनीकरण करूया असे जाहीर केले आहे. 4 जून रोजी निकाल जाहीर झाल्यानंतर नकली शिवसेना आणि नकली राष्ट्रवादी वाल्यांनी अजितदादांच्या सोबत यावे छाती काढून उभे राहावे नक्कीच त्यांचे स्वप्न पूर्ण होतील, अशी जाहीर ऑफर सुद्धा मोदी यांनी दिली.
आदिवासी शहिदांचे म्युझियम बनवणार
पंतप्रधान नरेंद्र मोदी पुढे म्हणाले की आम्ही शबरी पूजक आहोत परंतु काँग्रेसने कधीही आदिवासींच्या श्रद्धास्थानांचा सन्मान केला नाही स्वातंत्र्यासाठी अनेक आदिवासी हुतात्मा बनले असताना केवळ काँग्रेसच्या बड्या घराण्यांचा इतिहास सांगत राहिले म्हणून आम्ही आदिवासी स्वातंत्र्यसैनिकांच्या आणि वीर पुरुषांच्या आठवणी सांगणाऱ्या भव्य म्युझियमची उभारणी करणार आहोत.
डॉक्टर हिना गावित यांचे पुन्हा काँग्रेसला दिले आव्हान
आदिवासींना खरा न्याय मोदी सरकारच्या काळातच मिळाला त्यांच्या जीवनात कायापालट घडवणारे काम मागील दहा वर्षात होऊ शकले असे सांगतानाच महायुतीच्या उमेदवार डॉ. हिना विजयकुमार गावित यांनी मोदी सरकार आदिवासींचे आरक्षण हटवणार, हे काँग्रेस नेत्यांचे सांगणे जर खरे ठरले तर मी कायमचे राजकारण सोडून देईल. परंतु मोदी सरकारने तसे नाही केले तर काँग्रेस नेते राजकारण सोडतील का? या शब्दात महायुतीचे उमेदवार डॉ. हिना गावित यांनी आज पुन्हा काँग्रेस नेत्यांना जाहीर आव्हान दिले. आरक्षण आणि संविधान या संदर्भाने काँग्रेस कडून केली जाणारी दिशाभूल सविस्तरपणे मांडत मोदी सरकारच्या काळात झालेले विकास कार्य सांगितले. महाराष्ट्राचे आदिवासी विकास मंत्री डॉ. विजयकुमार गावित यांनी विकास कार्याला लक्षात घेऊन मतदारांनी डॉ. हिना गावित यांना बहुमताने विजयी करावे असे आवाहन केले.