साक्री : मतदारांनी वारंवार संधी देऊन सुद्धा ज्यांना कधी विकास करता आला नाही, ते काँग्रेस नेते खोटं बोलून लोकांची दिशाभूल करीत आहेत. आता आरक्षण, संविधान या सारखे मुद्दे घेऊन पुन्हा मतं मागायला येत आहेत. खोटारडेपणा करून दिशाभूल करणाऱ्या अशा नेत्यांना जागा दाखवा; असा हल्लाबोल महायुतीच्या उमेदवार डॉ. हिनाताई गावित यांनी विरोधकांवर केला.
महायुतीच्या नंदुरबार लोकसभा मतदारसंघाच्या उमेदवार डॉ. हिनाताई गावित यांनी 30 रोजी साक्री तालुक्यातील दहिवेल आणि चौपाळे जिल्हा परिषद गटातील लहान मोठ्या सर्व गावातून प्रचार फेरी काढून मतदारांशी संपर्क केला. यावेळी त्या बोलत होत्या. उमेदवार डॉ.हिना गावित यांच्या समवेत शिंदे गटाच्या शिवसेनेच्या आमदार मंजुळा गावित यांनी या प्रचार फेरीचे नेतृत्व केले.
जिल्हा परिषद सदस्य खंडू आप्पा कुवर, जिल्हा परिषद सदस्य सुनेत्रा साहेबराव गांगुर्डे, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष सुरेश सोनवणे, शिवसेना जिल्हाध्यक्ष तुळशीराम गावित, भाजप जिल्हा उपाध्यक्ष चंद्रजीत सुरेश पाटील, आदिवासी सेवक पुरस्कार प्राप्त ज्येष्ठ कार्यकर्ते वसंत घरटे, भारतीय जनता पार्टी युवा मोर्चा चे अध्यक्ष विकी कोकणी, विधानसभा निवडणूक प्रमुख मोहन सूर्यवंशी, सचिन देसले, संजय अहिरराव, तुषार घरटे यांच्यासह त्या भागातील विविध गावाचे सरपंच उपसरपंच कार्यकर्ते आणि महायुतीच्या घटक पक्षातील पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.